Chinchwad Bypoll Election Result: चिंचवड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी आणि भाजपामध्ये ‘काटे’ की टक्कर झाल्यानंतर अखेर भाजपाच्या अश्विनी जगतपा यांचा विजय झाला आहे. अश्विनी जगताप यांनी 1 लाख 35 हजार 603 मते मिळवली तर राष्ट्रवादीचे उमेदवार नाना काटे यांनी 99 हजार 435 मतं मिळाली. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी 44 हजार 112 एवढी मतं घेतली. राहुल कलाटे यांच्यामुळे मतविभागणी होऊन राष्ट्रवादीचा पराभव झाल्याचे बोलले जात आहे. वास्तविक असा पराभव होईल, असे भाकित विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीच सकाळी वर्तविले होते. यावेळी त्यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीची आठवण करुन दिली. ते म्हणाले, त्यावेळेस मीच राहुल कलाटेला अपक्ष उभा केले होते. तेव्हा त्याला सव्वा लाख मतं मिळाली होती. पण ती मतं त्याची नव्हती. हे आता त्याला समजले असेल. मतविभागणी होऊन आमचा पराभव झाला, हे अजित पवार यांनी मान्य केले.
काय म्हणाले होते अजित पवार?
अजित पवार म्हणाले, “राहुल कलाटे आणि नाना काटेंची मतं एकत्र केली, तर ती भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत. याचा अर्थ, पुढच्या निवडणुकीत आमच्यामध्ये बंडखोरी होता कामा नयेत, ही काळजी घेणं गरजेचं आहे. अर्ज भरल्यानंतर मी राहुल कलाटेला सांगण्याचा खूप प्रयत्न केला. पण राहुलनं माझं ऐकलं नाही. सगळ्याप्रकारे त्याला सहकार्य करण्याचं काम राज्यकर्त्यांनी केलं. मी चिंचवडमध्ये प्रचार करत असताना मला माहिती मिळत होती. राहुल आणि नानाची मते पाहिली तर ती भाजपाच्या उमेदवारापेक्षा जास्त आहेत. महाराष्ट्रामध्ये एक मेसेज नक्कीच गेला आहे की, तीन पक्षांनी एकत्र येऊन निवडणूक लढवली तर निवडणूक जिंकता येते. फक्त निवडणुकीसाठी निवडणून येण्याची क्षमता असलेल्या उमेदवाराला तिकीट दिले गेले पाहीजे. मग तो कोणत्याही पक्षाचा असो.”
हे ही वाचा >> Kasba Bypoll Election: टिळक कुटुंबियांना तिकीट मिळाले असते तर भाजपाचा पराभव टळला असता? शैलेश टिळक निकालानंतर म्हणाले…
तेव्हा मीच त्याला अपक्ष उभं केलं होतं
“मागच्यावेळी लक्ष्मण जगतापांच्या विरोधात मीच राहुलला अपक्ष उभं राहण्यास सांगितलं होतं, त्या निवडणुकीत राहुल कलाटेला लाखांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. त्याला वाटलं ही माझीच मतं आहेत. ती मतं त्याची नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची होती. मला उद्या बारामतीमध्ये लाख मतं मिळाली तर ती माझी मतं नसतात तर ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असतात. ती कार्यकर्त्यांनी, मतदारांनी दिलेली असतात. मी राहुलला सांगितलं की, बाबा ही मतं तुझ्या एकट्याची मतं नव्हती. पण राहुल ऐकायला तयार नव्हता. आता राहुलला त्याची खरी मतं कळली असतील पण त्याच्यामुळं आमचा उमेदवार पडला, हे सत्य आहे.”, अशा शब्दात अजित पवार यांनी राहुल कलाटेला टोला लगावला.
राहुलमुळे आमचा पराभव झाला असे आम्ही मानत नाही. दोन्ही आमचेच उमेदवार होते. मतांची विभागणी होऊन भाजपाचा उमेदवार विजयी झाला. उमेदवारीच्या बाबतीत काहीही झालं तरी आमच्यात कुणीही बंडखोरी करु नये, याची काळजी आम्हाला घ्यावी लागेल, असेही अजित पवार म्हणाले.