नारायण राणे आणि शिवसेना यांचं नातं आणि त्यात आलेले तीव्र मतभेद सर्वश्रुत आहेत. त्यामुळे चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी नारायण राणे, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि शिवसेनेची अनेक नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर येणार, हे जाहीर झाल्यानंतर तिथे राजकीय दावे-प्रतिदावे होणार असा अंदाज बांधला जात होता. नारायण राणेंनी यावेळी व्यासपीठावरून बोलताना उद्धव ठाकरे, विनायक राऊत आणि शिवसेनेवर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष पद्धतीने टीका केली. मात्र, हे करताना त्यांनी मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना शुभेच्छा देताना त्यांना सल्ला देखील दिला आहे.
चिपी विमानतळाचं उद्घाटन आज केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया, केंद्रीय मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सरकारमधील इतर काही मंत्री, तसेच खासदार, आमदार आणि नेतेमंडळींच्या उपस्थितीत झालं. यावेळी बोलताना नारायण राणेंनी शिवसेनेवर टीका करतानाच पहिल्यांदाच आमदार आणि मंत्री झालेल्या आदित्य ठाकरेंना शुभेच्छा देत एक सल्ला देखील दिला.
आदित्य ठाकरेंनी ४८१ पानांचा अहवाल वाचावा
दरम्यान, सिंधुदुर्गाच्या विकासासाठी राणेंनी काम दिलेल्या टाटाने सादर केलेल्या अहवालाचा उल्लेख यावेळी नारायण राणेंनी केला. “सन्माननीय आदित्य ठाकरे पर्यटन मंत्री आहेत. त्यांनी इथला अभ्यास करावा. ४८१ पानांचा टाटांचा रिपोर्ट वाचावा. निसर्ग कसा ठेवावा, पायाभूत संरचना कशा उभ्या कराव्यात ते पाहावं. तुम्ही अहवाल वाचा आणि त्या योजनांसाठी निधी द्या. इथल्या धरणाला एक रुपया देखील अजून दिलेला नाही. माझ्या वेळी जेवढं धरणाचं काम झालं, त्याच्या पुढे आज एक टक्काही काम गेलेलं नाही”, असं राणे यावेळी म्हणाले.
विमानतळाबाहेर रस्त्यावरील खड्डे बघायचे का? चिपीच्या उद्घाटनात नारायण राणेंची राज्य सरकारवर तोफ
“कर्तबगार मंत्री म्हणून काम करून दाखवा”
यावेळी बोलताना नारायण राणेंनी आदित्य ठाकरे सिंधुदुर्गात आल्याबद्दल आनंद व्यक्त केला. “आदित्य ठाकरे या उद्घाटन कार्यक्रमासाठी माझ्या जिल्ह्यात आले. माझ्या दृष्टीने आदित्य टॅक्स फ्री आहे. मी त्याला काहीच बोलत नाही आणि बोलणार नाही. त्याला शुभेच्छा देईन. बाळासाहेबांना आणि सन्माननीय उद्धव ठाकरेंना कर्तबगार मंत्री म्हणून काम करून दाखवा. मला आनंद आहे”, असा सल्ला राणेंनी आदित्य ठाकरेंना दिला.