चिपळूण : चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शेखर निकम यांचा विजय झाला. महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी त्यांना कडवी झुंज दिली. चिपळूण तालुक्यात दोन्ही उमेदवारांमध्ये काटे की टक्कर पाहायला मिळाली. मात्र संगमेश्वर आणि देवरुख मधून निकम यांना आघाडी मिळाली ती कायम टिकली. त्यामुळे शेखर निकम यांचा ६७२२ मतांनी विजयी झाला.
चिपळूण संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून शेखर निकम तिसऱ्यांदा निवडणुकीच्या रिंगणात होते. तर प्रशांत यादव यांनी प्रथमच निवडणूक लढवली. दोन्ही गटाकडून चुरशीने मतदान करून घेण्यात आले. त्यामुळे निकाल काय लागेल याची सर्वांना उत्सुकता होती. युनायटेड इंग्लिश स्कूलच्या गुरुदक्षिणा सभागृहात सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. निकाल समजून घेण्यासाठी मतदारसंघातील कार्यकर्ते शहरात सकाळी सात वाजेपासून दाखल झाले होते. त्यामुळे शहरात सकाळी वर्दळ दिसून आली. मार्कंडी येथील मेहता पेट्रोल पंपाच्या परिसरात महायुतीच्या कार्यकर्त्यांची थांबण्याची व्यवस्था करण्यात आली होती. तर स्वामी मठाच्या परिसरात महाविकास आघाडीचे कार्यकर्ते थांबले होते. मतमोजणीच्या ठिकाणी गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दोन्ही भागात थांबलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांकडून योग्य ती समज देण्यात आली होती. खाडीपट्टा भागातून मतमोजणीला सुरुवात झाली. पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांनी मताधिक्य घेण्यास सुरुवात केली. खाडीपट्टा, पेढे, मालदोली, दसपट्टी, पोफळी, चिपळूण शहर भागात प्रशांत यादव यांनी आघाडी घेतली. मात्र सावर्डे, असुर्डे, कोकरे गटातून शेखर निकम यांनी चांगले मताधिक्य घेतले त्यामुळे प्रशांत यादव यांचे मताधिक्य कमी झाले. चिपळूण तालुक्यातील शेवटची बारावी फेरी संपली तेव्हा यादव यांना ९३७ मतांची आघाडी होती. संगमेश्वर तालुक्यातील कोंडीवरे भागाची तेरावी फेरी सुरू झाली तेव्हा शेखर निकम ३३ मताने पुढे आले. त्यानंतर अखेरच्या २४ व्या फेरीपर्यंत शेखर निकम यांचे मताधिक्य कायम राहिले.
हेही वाचा >>> Maharashtra Vidhan Sabha Result : रत्नागिरी विधानसभा मतदार संघातून सर्वाधिक १ लाख ११ हजार ३३५ मते मिळवून उदय सामंत विजयी
कार्यकर्त्यांची घोषणाबाजी सुरू होती. राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत पक्षाचे झेंडे फडकवत होते. शेखर निकम यांनी आघाडी घेतल्यानंतर महायुतीच्या कार्यकर्त्यांना जोर चढला. दरम्यान महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सन्नाटा पसरला होता. निकम यांची आघाडी वाढत गेल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते माघारी परतू लागले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी सुरू केली. गुलाळाची उधळण करत डीजेच्या तालावर कार्यकर्ते नाचू लागले. शहर आणि ग्रामीण भागात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला.
हेही वाचा >>> Shivsena : जनतेच्या दरबारी ‘शिवसेने’चा निकाल? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “असली – नकलीमध्ये…”
प्रशांत यादव यांना 2480 मतांची आघाडी
चिपळूण शहरातून किमान पाच ते आठ हजारापर्यंतची आघाडी मिळेल. असा दावा महायुती आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी केला होता परंतु महाविकास आघाडीचे प्रशांत यादव यांना 2480 मतांची आघाडी मिळाली. तर चिपळूण तालुक्यातून यादव यांना 414 मतांचे मताधिक्य मिळाले.
अजित पवारांच्या फोन नंतर शेखर निकम यांना धीर
मतमोजणी सुरू असताना शेखर निकम पिछाडीवर होते. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा त्यांना फोन आला. तेव्हा निकम यांनी पुढे काय अडचण येऊ शकते माहित नाही असे अजित पवार यांना सांगितले. त्यानंतर अजित पवार यांनी हिम्मत हारू नको चांगलेच होईल असे शेखर निकम यांना सांगितले. त्यानंतर शेखर निकम यांना धीर आला.