महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वकष योजना जाहीर केली जाईल असंही सांगितलं. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यामधील एका घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना आणि खास करुन शिवसेनेला चांगलच धारेवर धरलं आहे. शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटी केल्यामुळे त्यांच्यावर सर्वच स्तरामधून टीका होताना दिसत आहे. आता भाजपा नेते नितेश राणे यांनी टीका केलीय. नितेश राणे यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये याच व्यक्तीमुळे आमच्या १२ आमदारांचे निलंबन झालं आहे ते आता कोणत्या नैतिकतेमध्ये बसते?, असा प्रश्न उपस्थित केलाय.
नक्की वाचा >> मनसेचा इशारा, “भास्कर जाधव, कोकणी माणूस तुम्हाला…”
“मी सांगितले होते की, हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच आहे. तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज एका महिलेवर हात उगारताना दिसला. अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्यामुळे विधानसभेमधल्या आमच्या १२ आमदारांचे निलंबन करणे कोणत्या नैतिकतेत बसते?.” असं ट्विट नितेश राणेंनी केलंय.
मी सांगितले होते की,
हा भास्कर जाधव तमाशातील सोंगाड्या आणि दशावतारातील शंकासुरच आहे!!
तेव्हा विधानसभेमध्ये भावनिक सोंग करणारा आज एका महिलेवर हात उगारताना दिसला.
अशा सोंग बदलणाऱ्या सोंगाड्या मुळे विधानसभेमधल्या आमच्या १२ आमदारांचे निलंबन करणे कोणत्या नैतिकतेत बसते? pic.twitter.com/ZhoRgu8Mzc— nitesh rane (@NiteshNRane) July 25, 2021
नक्की पाहा >> Photos : भास्कर जाधवांविरोधात भाजपा रस्त्यावर; पुण्यात केलं जोडे मारो आंदोलन
निलंबन प्रकरण काय?
राज्यामध्ये पाच आणि सहा जुलै रोजी पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन करण्यात आलं होतं. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विधासभेमध्ये प्रचंड गदारोळ झाला. ओबीसी आरक्षणावरुन झालेल्या गोंधळानंतर गैरवर्तवणूकीचा ठपका ठेवत भाजपाच्या १२ आमदारांचं निलंबन करत असल्याची घोषणा तालिका अध्यक्ष भास्कर जाधव यांनी केली होती. गिरीश महाजन, आशीष शेलार, संजय कुटे, अतुल भातखळकर, अभिमन्यू पवार, नारायण कुचे, हरीश पिंपळे, राजकुमार रावल, राम सातपुते, योगेश सागर, पराग अळवणी, कीर्तिकुमार भंगाडिया या आमदारांचा निलंबित आमदारांमध्ये समावेश आहे. या आमदारांचे एक वर्षांसाठी निलंबन करण्यात आले असून, या कालावधीत विधान भवनाच्या आवारात त्यांना प्रवेशबंदी आहे.
नक्की काय बाजाबाची झाली?
काल (२५ जुलै २०२१ रोजी) चिपळूणच्या पहाणी दौऱ्यावर असणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुख्य बाजारपेठेमध्ये व्यापाऱ्यांचं झालेलं नुकसान आणि गाऱ्हाणी ऐकत होते त्यावेळी स्वाती भोजने या त्यांच्या दुकानासमोर उभ्या होत्या. मुख्यमंत्री पहाणी करताना स्वाती यांच्या दुकानासमोर आले तेव्हा स्वाती यांनी आपली व्यथा मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. “माझं घर गेलं… माझं दुकान गेलं… तुम्ही काहीतरी करा…”, असं म्हणत स्वाती यांनी आपली तक्रार मांडण्यास सुरुवात केली. “तुम्ही काय पण करा… तुम्ही आमदार-खासदारांचा दोन महिन्यांचा पगार कोकणासाठी फिरवा… तुम्ही काय पण करा पण मदत करा..”. असं अगदी रडत रडत स्वाती यांनी सांगितलं. यावर मुख्यमंत्र्यांनी मान हलवत होकार देत, “वळवतो… वळतवो..” असं म्हटलं.
मात्र त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासोबत असलेले स्थानिक आमदार आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी अगदी दमदाटीच्या स्वरामध्ये स्वाती यांच्या मुलाला आईला समजवण्यास सांगितलं. आमदार, खासदारांचा दोन महिन्याचा पगार देण्याच्या मागणीवर भाष्य करताना जाधव यांनी, “हे बघा आमदार खासदार पाच महिन्याचा पगार देतील पण त्याने काय होणार नाही,” असं स्वाती यांना सांगितलं. त्यावर फूल ना फुलाचा पकळी समजून आम्हाला मदत करा अशी मागणी स्वाती यांनी केली. मात्र भास्कर जाधव यांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष करत चला म्हणत मुख्यमंत्र्यांसोबतच्या ताफ्यातील लोकांना पुढे जाण्याचा इशारा केला. मात्र त्यानंतर मागे वळून पाहत, “बाकी काय?, तुमचा मुलगा कुठंय” असं भास्कर जाधव यांनी हातवारे करुन विचारलं. त्यानंतर स्वाती यांचा मुलगा दिसताच, “आईला समजव… आईला समजव… उद्या भेट” असं भास्कर जाधव म्हणाले. या भेटीचं आमंत्रणही त्यांनी दमदाटीच्या स्वरातच दिल्याचं पहायला मिळालं.