‘महावितरण’मधील विद्युत सहायकपदावर दुसऱ्या जिल्ह्य़ातील उमेदवार सिंधुदुर्गात नोकरीस आल्यानंतर सिंधुदुर्ग काँग्रेस आणि कंत्राटी वीज कामगारांच्या संघटनेने परजिल्ह्य़ातील उमेदवारांविरोधात सुरू केलेले आंदोलन तीव्र होऊ लागले आहे.  
  त्यातूनच शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्य़ातील चिपळूणमधील मुलगीही मालवणमध्ये ‘उपरी’ ठरली आहे. परजिल्ह्य़ातील असल्याने परत जाण्यासाठी वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे मालवण सोडून परतीची वाट धरण्याची वेळ या विवाहितेवर आली आहे. महाराष्ट्राचा पुरोगामीपणाचा आणि काँग्रेसचा सर्वसमावेशकतेचा दावा या घटनेमुळे पोकळ ठरला आहे.
‘महावितरण’च्या विद्युत सहायकपदावर ‘परप्रांतीय’ नव्हे तर महाराष्ट्रातीलच, पण अन्य जिल्ह्य़ातील उमेदवार रुजू झाल्याचे कळताच सिंधुदुर्गातील काँग्रेसच्या नेतृत्वाखालील कंत्राटी वीज कामगार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना पिटाळून लावले.
या आंदोलनाचा फटका अगदी शेजारच्याच नव्हे तर खासदार डॉ. नीलेश राणे यांच्या  मतदारसंघात येणाऱ्या रत्नागिरीतील चिपळूणच्या विवाहितेलाही बसला. या २५ वर्षीय विवाहितेला विद्युत सहायकपदावर नेमले गेले. तिला सिंधुदुर्गात मालवणमध्ये नियुक्ती मिळाली. त्यानुसार ती जूनच्या पहिल्या आठवडय़ात रुजू झाली. पण नंतर कंत्राटी वीज कामगार संघटना आणि जिल्हा काँग्रेसने स्थानिक उमेदवारांना नियुक्ती द्या, परजिल्ह्य़ातील उमेदवार सिंधुदुर्गात नको, अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केले. त्यातूनच बाहेरच्या जिल्ह्य़ातून आलेल्या मुलांना मारहाण करत पिटाळण्यात आले. या विवाहितेलाही धमकावणे सुरू झाले.  तशातच तिचे लहान मूल आजारी पडले तर लवकर मदतही मिळाली नाही. अखेर  ही महिला चिपळूणला परतली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chiplun girl outsider in sindhudurg