ध्येयवादी, परखडपणे विचार मांडणारे तसेच निस्पृहपणे रहाणारे स्व. वा. ग. तथा अण्णासाहेब चिरमुले मी लहानपणी पाहिले आहेत. त्यांच्या सारखी माणसे आता होणे अवघड पण त्यांच्या विचाराने देश चालवला तर तो नक्की सुजलाम सुफलाम होईल असे मत माजी आयुक्त डी. एन. वैद्य यांनी काढले.
अण्णासाहेब चिरमुले यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त अण्णासाहेब चिरमुले चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने विश्वस्त भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
सातारा शहरात ललामभूत ठरणारी अनेक व्यक्तिमत्त्वे निर्माण झाली. शंकरराव साठे, भाऊसाहेब सोमण यांना पाहात आपण मोठे झालो. यांच्या बरोबर चिरमुले यांनी दिलेले योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे असे वैद्य म्हणाले.
यावेळी युनायटेड वेस्टर्न बँकेचे माजी अध्यक्ष पी. एन. जोशी, डॉ. अशोक गोंधळेकर, अरुण गोडबोले, आर. जी. टंकसाळे, माजी नगराध्यक्ष डॉ. अच्युत गोडबोले, मानसी माचवे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहण्यात आली.
अण्णासाहेब चिरमुले यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त २२ जून रोजी स्वयंवर मंगल कार्यालयात दै. लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांचे, ‘राजकारण व अर्थकारणाची भावी दिशा’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे अशी माहिती ट्रस्टच्या वतीने देण्यात आली.