‘चितळे डेअरी’चा ‘ब्रह्मा’ प्रकल्प यशस्वी; जगातील पहिलाच प्रयोग
जनुकीय तंत्राच्या आधारे केवळ स्त्री-बीजांच्या वापरातून कृत्रिम रेतन करत जगातील पहिल्या म्हशीचा भिलवडीतील चितळेंच्या ‘ब्रह्मा’ या प्रकल्पात जन्म झाला. या प्रयोगातून नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी जन्माला आलेल्या या म्हशीचे ‘दुर्गा’ असे नामकरण करण्यात आले आहे.
म्हशीपासून केवळ म्हैस किंवा रेडी जन्माला घालण्याचा हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याची माहिती चितळे डेअरी आणि ‘जीनस एबीएस’चे संचालक विश्वास चितळे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी या समूहातील अतुल चितळे, आनंद चितळे, मकरंद चितळे आणि काकासाहेब चितळे हे उपस्थित होते.
‘चितळे डेअरी’मध्ये या प्रकारच्या संशोधनासाठी ‘ब्रह्मा’ नावाच्या स्वतंत्र प्रकल्पाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या प्रकल्पामध्ये या संशोधनासाठी (केवळ मादी जातीचे कृत्रिम रेतन) शंभरहून अधिक चांगल्या जातीचे रेडे आणि वळू जोपासले आहेत. यातीलच ‘महाबली’ जातीच्या रेडय़ाच्या वीर्याचा या प्रयोगासाठी वापर करण्यात आला. त्याच्या वीर्यामधील स्त्री-बीज विलग करून त्याचे मुऱ्हा जातीच्या म्हशीच्या गर्भामध्ये रोपण करण्यात आले. हे रोपण यशस्वी झाले असून हा जगातील पहिलाच प्रयोग असल्याचे चितळे यांनी सांगितले.
या प्रयोगातून जन्म झालेल्या म्हशीचे वजन ३२ किलो आहे. या प्रयोगासाठी निवडलेली मुऱ्हा जातीची म्हैस ही अधिक स्निग्धांशाचे दूध देणारी आहे, म्हणून तिची निवड करण्यात आली. आता तिच्यापासून तयार होणारी ही पुढची पिढीही तितकीच सुदृढ असणार आहे. सर्वसाधारण जातीच्या म्हशीकडून एका वेताच्या चक्रात १२०० लिटर दूध मिळते. तर या मुऱ्हा जातीच्या म्हशी ४ हजार लिटपर्यंत दूध देतात. या जातीच्या म्हशीपासून ही कृत्रिमरीत्या पुढची केवळ ‘म्हशीं’ची पिढी तयार करण्यात येणार आहे.
परिणाम काय?
जागतिक पातळीवर दूध व्यवसायाचा विचार केला तर आपल्या देशात सर्वाधिक दुभत्या जनावरांची संख्या आहे. मात्र, जगाच्या तुलनेत दूध उत्पादनाचा वाटा मात्र केवळ १० टक्के एवढाच आहे. या साऱ्यांमागे चांगल्या जातीच्या गाई-म्हशी नसणे हे आहे. या प्रकारच्या कृत्रिम रेतनातून आपण चांगल्या गाई-म्हशींची निर्मिती करू शकू असेही चितळे म्हणाले.
स्त्री-बीजांना लगोलग मागणी
केवळ म्हशीसाठीच्या कृत्रिम रेतनाचा हा प्रयोग यशस्वी होताच या प्रकारच्या बीजांना लगेच मागणी येऊ लागली आहे. हरियाणा राज्य सरकारने या प्रकारच्या १ लाख २० हजार स्त्री-बीजांची मागणी ‘चितळे डेअरी’च्या संशोधन प्रकल्पाकडे नोंदवली आहे. भारताबाहेर श्रीलंका, व्हिएतनाम येथूनही अशा प्रकारची मागणी आल्याचे चितळे यांनी सांगितले.
प्रयोग काय?
- नैसर्गिक अथवा कृत्रिम रेतनातून आजवर नर (रेडा) किंवा मादी (म्हैस) दोन्हींचेही जन्म होत होते. पण दूध धंद्यासाठी मादी म्हणजेच चांगल्या जातीच्या म्हशीचीच आवश्यकता असल्याने ‘चितळे डेअरी’त यावर गेले तीन वर्षे संशोधन सुरू होते.
- यासाठी त्यांनी उत्तम दर्जाच्या नराच्या (रेडा) वीर्यामधून स्त्री-बीजाचे विलगीकरण करून त्याचे अधिक दूध देणाऱ्या आणि आशियायी हवामानात टिकू शकणाऱ्या दुभत्या जातीच्या म्हशीबरोबर कृत्रिमरीत्या संकर केले.
- हा प्रयोग यशस्वी झाला असून १० ऑक्टोबर रोजी पहिल्या म्हशीचा जन्म झाला आहे.