भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी अहमदनगर जिल्ह्यात एका सात वर्षीय मुकबधीर मुलीवर अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. तसेच हे प्रकरण दाबण्यासाठी संस्थाचालकांनी पीडित मुलीचे आई-वडील आणि नातेवाईकांवर दबाव आणल्याचंही चित्रा वाघ यांनी सांगितलं. या प्रकरणी तातडीने निष्पक्ष चौकशी होऊन दोषींना शिक्षा व्हावी, अशी मागणी वाघ यांनी केली. त्या गुरुवारी (६ ऑक्टोबर) अहमदनगरमध्ये बोलत होत्या.
चित्रा वाघ म्हणाल्या, “नगर जिल्ह्यात अतिशय भयानक प्रकार झाला आहे. सात वर्षाच्या मुकबधीर मुलीला संगमनेरच्या संग्राम मुकबधीर होस्टेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. ती मागील चार महिन्यांपासून तेथे राहत होती. त्या मुलीच्या आई-बाबांना अचानक फोन आला की, मुलीला त्रास होतोय, तिला घेऊन जा. आई-बाबा तिथे गेल्यावर लक्षात आलं की गुप्तांगावर जळाल्याच्या खुणा आहेत आणि चामडी निघालेली आहे.”
“मुलीला लपवून ठेवण्यात आलं”
“अशावेळी खरंतर वसतिगृहाचे अधीक्षक किंवा वार्डन यांनी आई वडिलांसोबत जाऊन डॉक्टरांकडे जाऊन उपचार करायला हवे होते. या गोष्टी संशयास्पद आहेत, कारण मुलीचे आई-वडील वसतिगृहात गेले तर त्यांना एका जागेवर बसवण्यात आले. मामाही गेला होता, मात्र मुलीला लपवून ठेवण्यात आलं होतं. मामाने दबंगगिरी केली तेव्हा त्यांनी भाचीला आणलं,” असं चित्रा वाघ यांनी सांगितलं.
“तुम्हाला पैसे देतो हे प्रकरण पुढे वाढवू नका”
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “सामाजिक कार्यकर्त्यांना तुम्हाला पैसे देतो हे प्रकरण पुढे वाढवू नका, पोलीस स्टेशनला तक्रार करू नका असं संबंधित संस्थेकडून सांगण्यात आलं. पत्रकारांनाही तुम्ही हे प्रकरण वाढवू नका असं सांगण्यात आलं. पीडित लहान मुलीच्या नातेवाईकांच्या घरी रात्री दोन वाजता संस्थेची माणसं गेली आणि प्रकरण वाढवू नका असं सांगितलं. अशाप्रकारे त्या मुलीसोबत अतिशय संशयास्पद प्रकार घडला.”
हेही वाचा : आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार करून हत्या, ४२ दिवस मृतदेह पुरल्याचा आरोप, चित्रा वाघ म्हणाल्या…
“पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल तर कारवाई व्हावी”
“या लेकरांना बोलता येत नाही. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे आणि दोषी समोर आले पाहिजेत. ज्यावेळी अशा घटना घडतात तेव्हा त्याची लगेच दखल घेणं गरजेचं असतं. अशा घटनांमध्ये पोलिसांनी हलगर्जीपणा केला असेल तर कारवाई होणं आवश्यक असतं. पॉक्सोच्या कायद्यामुळे किमान ६० दिवसांमध्ये या प्रकरणाचं आरोपपत्र दाखल होईल,” असंही चित्रा वाघ यांनी नमूद केलं.