भीमा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील आणि भाजपाचे खासदार धनंजय महाडिक यांच्यात हा ‘सामना’ रंगला आहे. या निवडणुकीचा प्रचार करताना राजन पाटील यांनी धनंजय महाडिक यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली आहे.
“ही निवडणूक भीमा कारखान्याची की राजन पाटलांच्या कुटुंबाची आहे, हेच कळायला मार्ग नाही. ते आमच्या पोरांना बाळ म्हणत आहेत. अरे आम्ही पाटील आहोत. याला माहितीच नाही की, पाटलाच्या पोराला लग्नाच्याही आधी यांच्याएवढी पोरं असतात. त्याचा आम्हाला अभिमान आहे,” असं वक्तव्य राजन पाटील यांनी केलं आहे. त्यांच्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.
हेही वाचा : शिंदे गटात धुसफूस, दादा भुसेंवर सुहास कांदेंची नाराजी?; म्हणाले…
राजन पाटील यांच्या वक्तव्यावर भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी टीका केली आहे. “राजन पाटलांचं वक्तव्य संतापजनक आणि निषेधार्ह आहे. त्यांचं वक्तव्य वैयक्तिक आहे की, पक्षाचं याचा खुलासा पाटील यांनी करावा. मागील आठ दिवसांपासून ज्या रणरागिनी महिलांच्या सन्मानासाठी गदारोळ करत होत्या, त्यांची आता भूमिका काय आहे. राजन पाटलांना महाराष्ट्रात फिरून देणार आहात का? आंदोलन करणार?,” असा प्रश्न चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीला विचारला आहे.
हेही वाचा : राजीव गांधींची मारेकरी नलिनीने तुरुंगातून सुटताच तामिळनाडू जनेतेचे मानले आभार; म्हणाली…
“सोलापूर पोलिसांनी राजन पाटील यांच्यावर ३५४ नुसार विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा सन्मान झाला पाहिजे. महिला सन्मानाची भूमिका असलेल्या राष्ट्रवादी पक्षाची, राजन पाटलांनी माती केली आहे. राजन पाटलांवर पक्ष काय कारवाई करतो हे बघणं गरजेचं आहे,” असेही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.