अयोध्येतील बाबरी मशिदीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देऊन तीन वर्ष उलटली असून अजूनही तो मुद्दा मात्र राजकीय वर्तुळात फिरत आहे. नुकताच विद्यमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एका जाहीर सभेत केलेल्या दाव्यामुळे पुन्हा एकदा बाबरीचा मुद्दा तापला आहे. अयोध्येतील बाबरी मशीद पाडली तेव्हा मी स्वत: त्या ठिकाणी उपस्थित होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोचक टीका केली होती. यावरून आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी जयंत पाटलांना प्रतिटोला लगावला आहे.
फडणवीस म्हणतात, “..मी त्याच ठिकाणी होतो!”
मुंबईच्या सोमय्या मैदानावर घेतलेल्या ‘बूस्टर सभे’मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना बाबरी मशिदीच्या मुद्द्यावरून वक्तव्य केलं होतं. “हे सांगतात आम्ही बाबरी मशिद पाडली. मी त्याला मशिद मानत नाही, तो परकीय आक्रमकांनी उभा केलेला पारतंत्र्याचा ढाचा होता. कोणी हिंदू मशिद पाडूच शकत नाही. तो ढाचा पाडण्याचं काम आम्ही केलं हे अभिमानाने सांगतो. माझा शिवसेनेला सवाल आहे की तो ढाचा पडला तेव्हा तुम्ही कोठे होता? मी अभिमानाने सांगतो, होय मी तो ढाचा पाडण्यासाठी त्याच ठिकाणी होतो. हा देवेंद्र फडणवीस तो ढाचा पाडण्यासाठी त्या ठिकाणी होता”, असं फडणवीस म्हणाले होते.
“…तर अडवाणींवर गुन्हा दाखल होईल”
त्यावर बोलताना जयंत पाटील यांनी खोचक टीका केली आहे. “बाबरी पाडली तेव्हा आपण त्या ठिकाणी होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. १९९२ साली देवेंद्र फडणवीस अवघ्या १३ वर्षांचे होते. त्यावेली फडणवीस अयोध्येला गेले असतील तर हे गंभीर प्रकरण आहे. याप्रकरणी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर १३ वर्षांच्या बालकाला अयोध्येला नेऊन त्याचे प्राण धोक्यात घातले म्हणून गुन्हा दाखल होऊ शकतो”, असं जयंत पाटील म्हणाले होते.
बाबरी ढाचा पाडताना शिवसेनेचा एकही नेता तेथे हजर नव्हता : देवेंद्र फडणवीस
“हेची फळ काय मम तपाला?”
दरम्यान, या मुद्द्यावरून आता चित्रा वाघ यांनी जयंत पाटील यांना प्रतिटोला लगावला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर ट्वीट करताना चित्रा वाघ यांनी “बाबरी मशीद पडली तेव्हा देवेंद्र फडणवीस फक्त १३ वर्षांचे, अडवाणींनी लहान मुलाचे प्राण धोक्यात घातले’ इति जंत पाटील. १९७० साली जन्मलेले देवेंद्र फडणवीस १९९२ साली १३ वर्षांचे होते हे जयंत पाटलांचे गणित बघून त्यांच्या गणिताच्या शिक्षकांना पश्चाताप होत असेल. हेची फळ काय मम तपाला”, अशा शब्दांत टोला लगावला आहे.
दरम्यान, एकीकडे राज्यात राज ठाकरेंच्या भोंग्यांबाबतच्या भूमिकेवरून राजकारण तापलेलं असताना पुन्हा एकदा बाबरीचा मुद्दा चर्चेत आला आहे.