राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या बलात्काराच्या तक्रारीसंदर्भात एक नवीन माहिती समोर आली असून या प्रकरणातील पीडितेनं घुमजाव केलं आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ आणि आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्या सांगण्यावरूनच आपण असं केल्याचा खळबळजनक दावा पीडितेनं केल्यामुळे या प्रकरणाला नवं वळण मिळण्याची शक्यता आहे. या प्रकरणावरून आता चित्रा वाघ यांच्यावर संशय घेतला जात असताना त्यांनी स्वत: यासंदर्भात व्हिडीओ जारी करून आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तसेच, व्हिडीओमध्ये शिवसेनेचं नाव घेत टीकास्त्र सोडलं आहे.
काय आहे प्रकरण?
३१ डिसेंबर रोजी मेहबूब शेख यांच्याविरुद्ध ठाण्यातल्या सिडको पोलीस ठाण्यात बलात्काराची तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यावरून विरोधकांनी सरकारला आणि सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला लक्ष्य करण्यास सुरुवात केली होती. मात्र, या प्रकरणातील पीडितेनंच आपला जबाब बदलत चित्रा वाघ आणि सुरेश धस यांचं नाव घेतलं आहे.
“राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्ध ३१ डिसेंबर २०२० रोजी सिडको ठाण्यात दिलेली बलात्काराची तक्रार खोटी आहे. यासंदर्भाने रचलेल्या कटात भाजपा नेत्या चित्रा वाघ व आष्टीचे आमदार सुरेश धस आहेत. आपल्यावर शीतपेयात गुंगीचे औषध टाकून अत्याचार करून त्याची चित्रफित सर्वत्र पसरवण्याची व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याने धस यांच्याकडून पैसे घेतले होते”, असा खळबळजनक दावा पीडितेनं केला आहे.
“आम्ही चौकशीला सामोरे जायला तयार”
दरम्यान, यासंदर्भात चित्रा वाघ यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला आहे. “मेहबूब शेखवर आरोप करणाऱ्या पीडितेनं घुमजाव करत चित्रा वाघ आणि सुरेश धस यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल केल्याचं म्हटलं आहे. यासंदर्भात आम्ही सर्व चौकशीला सामोरं जायला तयार आहोत. याआधीही शिवसेनेचा बलात्कारी नेता रघुनाथ कुचिक यानंही एका बलात्कारित पीडितेवर दबाव टाकला की चित्रा वाघ यांनी हे करायला भाग पाडलं असं सांगावं. त्यानंतर त्या मुलीनं माझं नाव घेतलं. पण ८ ते १० दिवसांत सत्य समोर आलं”, असं चित्रा वाघ या व्हिडीओमध्ये म्हणाल्या आहेत.
रायुकाँचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्याविरुद्धची बलात्काराची तक्रार करणाऱ्या पीडितेचे घुमजाव!
“असे अनुभव नवीन नाहीत”
“समाजकारणात काम करताना असे अनुभव आम्हाला नवीन नाहीत. आम्ही पहिल्या दिवसापासून तिला मदतच केली आहे. सर्व यंत्रणांना सहकार्य करण्याची आमची भूमिका असेल. असे अनुभव येतात म्हणून काम करणं आम्ही थांबवत नाहीत. ज्या ज्या ठिकाणी अशी राजकीय धेंडं येतात, तिथे अशी परिस्थिती उद्भवणं स्वाभाविक आहे. येणाऱ्या प्रत्येक चौकशीला सामोरं जाण्याची आमची तयारी आहे”, असं देखील चित्रा वाघ यांनी नमूद केलं आहे.