काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यसैनिक विनायक दामोदर सावरकर यांच्या माफीच्या पत्रावरून केलेल्या वक्तव्यानंतर भाजपा आक्रमक झाली आहे. राहुल गांधींनी सावरकरांचा अपमान केल्याचा आरोप करत गुरुवारी (१७ नोव्हेंबर) भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांच्या नेत्तृवात भाजपा युवा मोर्चा व महिला आघाडीने नागपुरातील टिळक पुतळा चौक येथे जोरदार आंदोलन केले. चित्रा वाघ यांनी राहुल गांधीवर जोरदार हल्ला चढवला. यावेळी भाजपा महिला कार्यकर्त्यांनी राहुल गांधी यांच्या प्रतिमेला चपला मारून आणि पुतळा जाळून निषेध केला. पुतळा जाळताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये धक्काबुक्कीही झाली.
चित्रा वाघ म्हणाल्या, “कोणीतरी लिहून दिलं आहे आणि राहुल गांधी ते वाचत आहेत. त्यांनी सावरकरांचा अपमान करण्याचं काम केलं आहे. सावरकरांचा अपमान केवळ महाराष्ट्राचा अपमान नाही, तर संपूर्ण देशाचा अपमान आहे. मला तर आश्चर्य या गोष्टीचं वाटतं की, बाळासाहेब ठाकरेंचे वारसदार सावरकरांचा सातत्याने अपमान करणाऱ्यांसोबत कसे फिरू शकतात. जन्माने कोणी कोणाचा वारस होत नाही, तर तो विचारांनी होतो हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे.”
“अवहेलना करण्याची हिंमत होतेच कशी?”
“ज्यांच्या देशभक्तीला पुजायला हवं, त्यांची अवहेलना करण्याची हिंमत होतेच कशी? हा प्रश्न उपस्थित होतो. एका ठिकाणी सावरकरांना भारतरत्न द्या म्हणायचं आणि दुसरीकडे त्यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी-काँग्रेसचे हात बळकट करण्याचं काम उद्धव ठाकरे, त्यांचा मुलगा आणि त्यांचा पक्ष कसं करू शकतात? हा महाराष्ट्राच्या जनतेचा त्यांना प्रश्न आहे. त्यामुळे भारत सावरकरांचा हा अपमान सहन करणार नाही,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
“…तर तुम्हाला या महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार नाही”
चित्रा वाघ पुढे म्हणाल्या, “इथं येऊन तुम्ही आमच्या श्रद्धेवर घाला घालणार असाल, तर तुम्हाला या महाराष्ट्रात फिरण्याचा अधिकार नाही. जे नेहमी हिंदुत्ववादी आहे असं म्हणतात ते राहुल गांधींसोबत कसे फिरू शकतात. त्यांना याबद्दल कसं वाईट वाटत नाही.”
“महाराष्ट्रात सावरकरांची अवहेलना सुरू असताना गप्प का?”
“महाराष्ट्रात सावरकरांची अवहेलना सुरू आहे. त्यावर उद्धव ठाकरे आणि त्यांचा गप्प का आहे? त्यामुळेच भाजपा उद्धव ठाकरेंचं हिंदुत्व बेगडी आहे असं नेहमी म्हणत आलंय. त्यांनी आणि त्यांच्या पक्षाने आता वागण्यातून हे दाखवून दिलं आहे,” असंही त्यांनी नमूद केलं.