भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी रविवारी (३ एप्रिल) कोल्हापूरमधील सैनिक वसाहतीतील सभेत दगडफेक झाल्याचा आरोप केला. तसेच गृहराज्यमंत्री पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजले असल्याचा घणाघात केला. गृहराज्यमंत्र्यांची दहशत बलात्काऱ्यांवर, गुंडावर हवी, विरोधकांवर नाही, असं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांना टोला लगावला. त्यांनी दगडफेकीबाबत कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर त्या माध्यमांशी बोलत होत्या.

चित्रा वाघ म्हणाल्या, “मी इतक्या वाईट पद्धतीने कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले कधीही पाहिलेले नव्हते. रविवारी (३ एप्रिल) भाजपाचे आमचे उमेदवार सत्यजित उर्फ नाना कदम यांची मुक्त सैनिक वसाहत या ठिकाणी प्रचारसभा चालू होती. तेथे माझं भाषण चालू असताना काही अज्ञातांनी दगडं मारण्यात आली. या संदर्भातच मी आज कोल्हापूरचे पोलीस अधीक्षकांची भेट घेतली. त्यांनी देखील या गोष्टीला पुष्टी दिली. कोल्हापूरचे पोलीसही सभेच्या ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी घेतलेल्या माहितीनुसार दगडं जरूर मारण्यात आली.”

“निवडणुकीत अशा पद्धतीच्या घटना घडणं निंदनीय”

“ही दगडं कोणाकडून मारली केली, ती माणसं कोण होती या संदर्भातील तपास कोल्हापूर पोलीस करत आहेत. मला विश्वास आहे की ज्यांनी कोणी हे काम केलं असेल ते पकडले जातील. कुठल्याही निवडणुकीत अशा पद्धतीच्या घटना घडणं निंदनीय आहे. मीच नाही, तर माझ्यासारख्या वेगवेगळ्या पक्षाच्या हजारो महिला प्रचारांमध्ये काम करत असतात. महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी फिरत असताना कोल्हापुरात जो प्रकार तो पहिल्यांदाच घडला. ज्यांनी हे काम केलं त्याचा मी निषेध करते,” असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.

“दगडफेकीचा तपास सुरू, लवकरच आरोपी समोर येतील”

चित्रा वाघ म्हणाल्या, “मला पुन्हा एकदा सांगायचं आहे की दहशत गुंडांवर असावी, बलात्काऱ्यांवर असावी आमच्यावर आणि कोल्हापूर जनतेवर अजिबात नसावी. आज मी पुन्हा पोलीस अधीक्षकांशी बोलले आहे. त्यांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं. तसेच ज्यांनी हे काम केलं ते लवकरच समोर येईल.”

हेही वाचा : “चित्रा वाघ आणि फिर्यादी संगनमताने आमची…”; रघुनाथ कुचिक यांच्या मुलीची राज्य महिला आयोगाकडे तक्रार

“गृहराज्यमंत्र्यांची दहशत बलात्कारी आणि गुंडांवर असावी”

“गृहराज्यमंत्र्यांची दहशत विरोधकांवर नाही, तर बलात्कारी आणि गुंडांवर असावी. त्याचे आकडे मी वाचून दाखवले आहेत. कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे महाराष्ट्रात तर निघाले आहेच, पण ज्या गृहराज्यमंत्री पालकमंत्री असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचे तीनतेरा वाजलेले आहेत,” असा आरोप चित्रा वाघ यांनी केला.

Story img Loader