स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलच तापलं. महाविकास आघाडीतील काँग्रेसचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेनेही राहुल गांधींच्या वक्तव्यावर असहमती दर्शवली. शिवाय शिवसेना(ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा सूचक इशाराही काँग्रेसला दिला होता. त्यामुळे राजकीय चर्चांना जोरदार उधाण आले होते. दरम्यान, आता खुद्द राहुल गांधी यांनीच संजय राऊतांना फोन केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे संजय राऊत यांनी स्वत: ही माहिती ट्वीटद्वारे दिली आहे. त्यानंतर आता संजय राऊतांना भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी त्यांना टोला लगावला आहे.
“बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली का वाहिली नाहीत? असं राहुल गांधींना विचारता आलं असतं. ओलावा संपला आहे. लाचारीत तो दिसतोय, सर्वज्ञानी संजय राऊत. ” असं चित्रा वाघ यांनी ट्वीटद्वारे म्हटलं आहे. सोबत त्यांनी संजय राऊतांचं ट्वीटही जोडलेलं आहे.
काय म्हणाले आहेत संजय राऊत –
“राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला होता. याआधीही त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. मात्र त्यांनी काल प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आम्हाला तुमची काळजी होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे राहुल गांधी मला म्हणाले. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.
“राहुल गांधी यांनी मला काल रात्री फोन केला होता. याआधीही त्यांनी माझी चौकशी केलेली आहे. मात्र त्यांनी काल प्रत्यक्ष फोन करून माझ्या प्रकृतीची चौकशी केली. आम्हाला तुमची काळजी होती. तुरुंगातून सुटल्यानंतर तुमची प्रकृती खालावली होती, असे राहुल गांधी मला म्हणाले. त्यांनी माझी प्रेमाने चौकशी केली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.