पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी एका ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून आत्महत्येचा इशारा दिला आहे. यामुळे सध्या मोठी खळबळ माजली आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये वनाधिकारी दिपाली चव्हाण यांच्या आत्महत्येचाही उल्लेख केलेला आहे. यावरुनच आता भाजपाच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी महाविकास आघाडी सरकार आणि स्थानिक आमदार निलेश लंके यांच्यावर हल्ला चढवला आहे.
आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केलेल्या व्हिडिओमधून त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवर केलेल्या पोस्टमध्ये ते म्हणतात, “सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणाऱ्यांकडून होत आहे का तेच आता पाहायचंय.”
“तिथल्या लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून त्यांनी आत्महत्येचा इशारा दिलाय. वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केलेल्या दिपाली चव्हाण यांना उद्देशून त्यांनी एक पत्र लिहिलं आहे आणि त्यांनी म्हटलं आहे की, मीही तुझ्याकडे लवकरच येत आहे. त्यात त्यांनी प्रशासनाकडून कसा छळ होतो, लोकप्रतिनिधी कसे त्रास देतात, वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचं दाहक वास्तव त्यांनी उभं केलं आहे. मध्येच त्या हमसून हमसून रडतानाही दिसत आहेत आणि हीच माझी सुसाईड नोट समजा असंही त्यांनी त्या क्लिपमध्ये म्हटलं आहे. खरं तर सुसाईड नोटमध्ये सगळ्यांची नावं लिहून ठेवायची आणि कोर्टात ती खोटी ठरली तर? हिरा बनसोडेसारखं फिर्याद कुणाकडे मागायची? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे”, असं वाघ यांनी आपल्या व्हिडिओमध्ये म्हटलं आहे.
पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांची ऑडीयो क्लीप ऐकली…..आणि मन सुन्न झालं
सत्तेतले हे बेलगाम घोडे…देवमाणूस म्हणून मिरवणार्या पारनेरच्या या लोकप्रतिनीधीच्या नाकात वेसणं घालायचं काम महिला सशक्तीकरणाच्या बाता मारणार्यांकडून होतयं का तेचं आता पहायचयं pic.twitter.com/6WuX2r6sXV
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 20, 2021
वाघ पुढे म्हणतात, लसीकरण केंद्रात एका आरोग्य कर्मचाऱ्याला लोकप्रतिनिधीकडून मारहाण होते. कारण फक्त एकच की तिथं दुकानदारांचं लसीकरण केलं. तिथे रात्रीच लोकप्रतिनिधी जातात. महिला आरोग्य कर्मचाऱ्याला खोदून-खोदून विचारतात. तिच्या लिपिकाला मारतात. थोड्यावेळाने लिपिकाचा व्हिडीओ येतो की मला लोकप्रतिनिधींनी मारलं नाही. महिला अधिकाऱ्यांना किंवा महिलांना कुणी वालीच राहिला नाही. त्यामुळे प्रत्येकीने सुसाईड नोट ही ड्रॉवरमध्ये ठेवा, असंही सांगायला त्या विसरलेल्या नाहीत. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात होत आहे. माँसाहेब जिजाऊंच्या महाराष्ट्रात होत आहे आणि आम्ही सावित्रीच्या लेकी, आमच्यासोबत हे सगळं होतंय. सत्तेच्या या बेलगाम घोड्यांना वेळीच वेसण घालणं गरजेचं आहे. देवमाणूस म्हणून वावरणाऱ्या पारनेरच्या या लोकप्रतिनिधीच्या नाकात महिला सशक्तीकरण आणि सक्षमीकरणाच्या बाता मारणारे कशी वेसण घालतात हेच आता पाहायचं आहे.
त्याचबरोबर “या महाराष्ट्रात बाई मेल्याशिवाय, तिने आत्महत्या केल्याशिवाय, तिने जीव दिल्याशिवाय तिच्या म्हणण्याला कुठे किंमत आहे?”, असा संतप्त सवाल चित्रा वाघ यांनी ट्विटरवरुन उपस्थित केला आहे.