भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना(ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. संजय राऊतांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म महाराष्ट्रात झाला होता, असं म्हटल्याचं समोर आलं आहे. यावरून चित्र वाघ यांनी ट्वीटद्वारे संजय राऊतांना टोला लगावला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, “रोज सकाळी महाराष्ट्राला ज्ञान देणारे सर्वज्ञानी इतके अज्ञानी असतील, याचं दर्शन आज महाराष्ट्राला झालं आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात नाही, मध्य प्रदेशमधील महू येथे झाला आहे. इतकं सामान्य ज्ञान असू नये? आमचे आदर्श असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल चुकीची माहिती देऊन तुम्ही काय मिळवता आहात?”
याशिवाय, “अशा पद्धतीने राष्ट्रपुरुषांचा अपमान तुम्ही करायचा आणि मोर्चेपण तुम्ही स्वत:च काढायचे, मूर्ख समजू नका महाराष्ट्र तुम्हाला पुरता ओळखून आहे, तुमचा जाहीर निषेध.” असंही चित्रा वाघ यांनी ट्विटरवरील व्हिडीओत म्हटलं आहे.
याचबरोबर संजय राऊतांच्या विधानाचा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत, “लो कर लो बात…सर्वज्ञानी संजय राऊत म्हणत आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म महाराष्ट्रात झाला. अहो…महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला आहे. तर हे असं आहे सर्वज्ञानी यांचं अगाध ज्ञान.” असंही चित्रा वाघ यांनी म्हणत संजय राऊतांना टोला लगावला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले आहेत? –
“लोकशाहीमध्ये असं घडू नये पण दुर्दैवाने महाराष्ट्रात घडतय. ज्या महाराष्ट्रात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला, ज्यांनी लोकशाही जन्माला घातली त्या महाराष्ट्रात हे घडतय दुर्दैवं आहे महाराष्ट्राचं.” असं संजय राऊत प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत.