भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी आज औरंगाबादमध्ये माध्यमांशी बोलताना महिला अत्याचारांच्या घटनांवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर देखील त्यांनी निशाणा साधला.
“१५ दिवसाची बाळांतीण आणि ८ महिन्याच्या गर्भवतीवर बलात्कार झालाय.. अन् संजय राऊतांची लेखणी महिला संरक्षणाऐवजी भ्रष्टाचाऱ्यांच्या रक्षणासाठी परजतेय…” अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
तसेच,“कदाचित..उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नसल्यानं संजय राऊत यांच्या पर्यंत औरंगाबाद महिला अत्याचाराची घटना पोहोचली नसेल..” असं देखील चित्रा वाघ यांनी बोलून दाखवलं आहे.
याचबरोबर, “औरंगाबाद पैठणतालुका तोंडोळी गावच्या घटनेवरून आपण निजामाच्या राजवटीत राहतोय का हा प्रश्न पडलाय. ओल्या बाळंतीणवर बलात्कार, गर्भवतीवर अत्याचार, दरोडेखोर मोकाट, उरला नाही कायद्याचा धाक. ‘शिवशाही’चं वचन देणाऱ्यांनी ‘निजामशाही’ आणलीय.” अशा शब्दांमध्ये चित्रा वाघ यांनी महाविकासआघाडी सरकारवर निशाणा देखील साधला आहे.