ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने टीका केली आहे. बावनकुळेंनी जितेंद्र आव्हाडांच्या विधानावर प्रतिक्रिया देताना औरंगजेबचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केल्यावरून विरोधकांनी त्यांच्याविरोधात रान उठवलेलं असतानाच संजय राऊतांनीही आज सामनातील रोखठोक या सदरातून बावनकुळेंच्या या विधानाचा समाचार घेतला आहे. यासंदर्भात सोलापुरातील पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा महिला आघाडीच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना सुनावलं आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊतांनी रोखठोकमध्ये औरंगजेब प्रकरणावरून भाजपावर टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी आधी ‘औरंगजेब क्रूर नव्हता’ असा उल्लेख केल्यामुळे वाद निर्माण झाला. त्यावरूनही संजय राऊतांनी कानपिचक्या दिल्या. मात्र, त्यावर बावनकुळेंनी बोलताना ‘औरंगजेबजी’ असा उल्लेख केल्यावरून राऊतांनी टीका केली आहे.
औरंगजेबाचं गुजरात कनेक्शन? संजय राऊतांचा भाजपाला टोला; म्हणाले, “म्हणून चंद्रशेखर बावनकुळेंनी…!”
“चंद्रशेखर बावनकुळे यांनी आव्हाड यांना धारेवर धरताना औरंगजेबाचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला. पण मला तेच एकमेव कारण दिसत नाही. औरंगजेबास ‘माननीय’ किंवा ‘औरंगजेबजी’ ठरवण्यामागे भाजपा नेत्यांची मानसिकता अशी की, औरंगजेबजी यांचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. जन्माच्या वेळी औरंगजेबाचे ‘पिताश्री’ गुजरातचे सुभेदार होते. औरंगजेबाच्या या गुजरात कनेक्शनमुळेच बावनकुळे यांनी त्याचा उल्लेख ‘औरंगजेबजी’ असा केला असावा! मागे एकदा काँग्रेसच्या नेत्याने अफझल गुरूचा उल्लेख ‘अफझल गुरूजी’ असा करताच याच भाजपने राष्ट्रवादाच्या नावाखाली धुमाकूळ घातला होता”, असं राऊतांनी या सदरात नमूद केलं आहे.
राऊतांना चित्रा वाघ यांचा टोला
दरम्यान, संजय राऊतांच्या या उल्लेखाच्या बाबतीत पत्रकारांनी विचारणा करताच चित्रा वाघ यांनी त्यावरून खोचक शब्दांत टोला लगावला आहे. “संजय राऊत आता खूप मोठ्या गॅपनं बाहेर आले आहेत. तिथे एवढे मानसिक, शारिरीक आघात होत असावेत. त्याचा परिणाम दूरगामी असतो. तो लगेच जात नाही. कदाचित ते अजून त्यातून बाहेर आले नसावेत. त्यामुळे ते अशी वक्तव्य करत राहतात. त्याकडे फार लक्ष देण्याची गरज नाही. आम्ही त्यांना फार गांभीर्याने घेतही नाही”, असं त्या यावेळी म्हणाल्या.