सोमवारी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिंदे गटावर सडकून टीका केली होती. भारतीय जनता पक्ष मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करत असून शिंदे गट हे निमूटपणे बघत आहे, असे ते म्हणाले होते. दरम्यान, या टीकेला भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी ट्वीट करत यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – “बाजार समितीचा निकालाची टिमकी वाजवण्यापेक्षा…”; एकनाथ खडसेंच्या ‘त्या’ टीकेला गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर!

नेमकं काय म्हणाल्या चित्रा वाघ

उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा मुंबई तोडण्याची जुनी कॅसेट वाजवायला सुरू केली आहे. मात्र, मुंबईची जनता सुज्ञ आहे. त्यांच्या या भूलथापांना येथील जनता भीक घालणार नाही, असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंना दिलं आहे.

पुढे बोलताना त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर खोचक शब्दांत टीकाही केली. उद्धव ठाकरे म्हणजे मुंबई नाही आणि उद्धव ठाकरे म्हणजे महाराष्ट्र नाही, त्यामुळे त्यांनी मुंबईची काळजी करू नये. मुंबई सांभाळण्यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे सक्षम आहेत. त्यांनी आधी त्यांचा पक्ष आणि आदित्य बाळाला सांभाळावं, असे त्या म्हणाल्या.

हेही वाचा – VIDEO: उद्धव ठाकरेंच्या वज्रमुठ सभेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते उबाठावाले…”

उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?

सोमवारी महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडली. या सभेत ठाकरे यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. मुंबई आंदण मिळालेली नसून ती मराठी माणसाने लढून मिळविली आहे. देशाला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या मुंबईच्या ठेवींवर भाजपचा डोळा असून, त्यांना शहराची मोडतोड करायची आहे. शिंदे सरकार हे निमूटपणे बघत आहे, अशी टीका त्यांनी भाजपा-शिंदे गटावर केली. तसेच मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांचे तुकडे केल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chitra wagh replied to uddhav thackeray after criticism of separate mumbai issue spb
Show comments