अभिनेत्री उर्फी जावेदच्या तोकड्या कपड्यांवरून काही दिवसांपासून वाद सुरु आहे. याप्रकरणी भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी मुंबईत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तसेच, अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि दिग्दर्शक संजय जाधव यांना नोटीस पाठवण्यासाठी महाराष्ट्र महिला आयोगाला वेळ आहे. पण, उर्फी जावेदवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं होतं. यानंतर चित्रा वाघ आणि आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यातील वाद चिघळला आहे.
यावर बोलताना खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा थांबवण्याची मागणी केली होती. “देवेंद्र फडणवीस यांना मी विनंती करते की उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पुढाकार घ्यावा. महाविकास आघाडीकडून आम्ही पुढाकार घेऊ. महिला आयोगाच्या अध्यक्षा काही करत नाहीयेत. जशी त्यांच्या घरात एक मुलगी आहे, तशीच त्यांच्याही घरात एक मुलगी आहे. अनेक महिलांवर आरोप प्रत्यारोप होत आहेत. हे आपले काम नाही. महिला आयोग त्यांच्या नियमांप्रमाणे काम करेल. त्याविषयी चर्चा कशाला करायची,” असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हेही वाचा : उर्फी जावेद प्रकरण : चित्रा वाघ आणि चाकणकरांमध्ये वाद चिघळला, पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया; म्हणाल्या…
सुप्रिया सुळेंच्या विधानानंतर आता चित्रा वाघ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “समाजस्वास्थाचं काम करण्यात येत तिथे राजकारण करण्याची गरज नसते. जे राजकारण करण्यासाठी उड्या मारत आहेत, त्यांना गुळ-खोबर देऊन आमंत्रण दिल नव्हतं. सुप्रिया सुळे सांगत आहेत, हे थांबवा. मी माझ्याकडून थांबवते. पण, ही विकृती थांबवण्यासाठी हा लढा सुरु आहे,” असं चित्रा वाघ म्हणाल्या. त्या तुळजापूरात प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
“वाईट याचं वाटतं ज्या बाईला तुम्ही त्याठिकाणी बसवलं आहे. तिला याच्यात विकृती दिसत नाही. त्यामुळे तुम्हाला काही सल्ले द्यायचे असतील, तर तुमच्या घरात द्या. आमच्या घरात देण्याची गरज नाही आहे,” असेही चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळेंना म्हटलं.
हेही वाचा : “मेरी डीपी इतनी धांसू, चित्रा मेरी सासू”, उर्फीने ट्वीट करत चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचलं
चित्रा वाघ यांचा अभ्यास कमी आहे, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या. याबद्दल विचारलं असता चित्रा वाघ यांनी सांगितलं की, “तुमचा अभ्यास किती आणि काय आहे, तो पेपर सुप्रिया सुळे यांच्या दरबारात सोडवावा. आम्हाला सांगण्याची गरज नाही. तुमचा अभ्यास किती आहे किंवा किती नाही, हे पाहून त्याठिकाणी बसवलं नाही आहे. आमचा अभ्यास एकदम पक्का आहे,” असं प्रत्युत्तर चित्रा वाघ यांनी दिलं.