Urfi Javed Chitra Wagh Controversy : ‘बिग बॉस’ फेम उर्फी जावेद सातत्याने आपल्या कपड्यांमुळे चर्चेत असते. उर्फी जावेदवर तिच्या कपड्यांमुळे सोशल मीडियावर टीका करण्यात येते. आता भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीच्या कपड्यांवर आक्षेप घेतला आहे. तसेच, उर्फीवर कारवाई करावी, असं निवेदन चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांना दिलं होतं. अशात शिवसेना ( ठाकरे गट ) उपनेत्या सुषमा अंधारेंनी या वादात उडी घेतली आहे.
सुषमा अंधारेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस, बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि केतकी चितळे यांचे अर्धवट कपड्यातील फोटो फेसबूकला शेअर करत चित्रा वाघ यांना खोचक सवाल विचारला होता. “उर्फी जावेदच्या वेशभूषेवर तुमचा आक्षेप असेल तर असाच आक्षेप तुम्ही कंगना राणौत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेणार का? यांनाही तुम्ही मारहाणीची भाषा वापराल का?. तसेच, नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्धी झोतात आणि चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकटत जाल,” असा टोला सुषमा अंधारेंनी चित्रा वाघ यांना लगावला होता.
हेही वाचा : “तिच्यासारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला…”, चित्रा वाघ व उर्फी जावेद वादात सुषमा अंधारेंची उडी
सुषमा अंधारेंच्या फेसबूक पोस्टवर आता चित्रा वाघ यांनी ट्वीट करत पलटवार केला आहे. “आपल्या कामाची गरज म्हणून कोणाचा पेहराव तसा असेल, तर तो झाला कामाचा भाग यावर माझा किंवा कोणाचाही आक्षेप असायचं कारण नाही. पण जिथे आपण समाजात वावरतो सार्वजनिक ठिकाणी भर वस्ती आणि रस्त्यावर खुल्या वातावरणात आपला पेहराव व्यवस्थित राखणं हे सामाजिक भान आहे. तो जर राखला जात नसेल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये? व्यक्तीस्वातंत्र्याचा सन्मान नं राखता, त्याचा अतिरेक करणाऱ्यांना रोखणं, हा ही धर्म नाही का?, लेकी-बाळी तर आपल्या प्रत्येकाच्याच घरी आहे, त्यांच्यासमोर असे आदर्श असावेत का?,” असा सवाल चित्रा वाघ यांनी विचारला आहे.
“स्री शिक्षित व्हाही, सक्षम व्हावी, यासाठी लढा देणाऱ्या सावित्रीमाईंनाही स्वैराचाराला प्रोत्साहन देणाऱ्या अश्या लेकी अभिप्रेत होत्या का?, जिथे समाजस्वास्थ्य महत्वाचं, तिथे राजकारण करण्याची गरज आहे का?, माझं आवाहन आहे की हे असे उपदव्याप रोखण्यासाठी एक होऊ या.. छत्रपतींचा आदर्श, सावित्रीचे संस्कार जपू या.. खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरणाचा जागर करू या.. हा विषय वाद अथवा राजकारणाचा नक्कीच नाही. तर सामाजिक स्वास्थ्य जपण्याचा आहे. ही फक्त माझीच नाही तर आपली सगळ्यांचीच जबाबदारी नाही का?,” असं चित्रा वाघ म्हणाल्या.
“व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वैराचार कदापी खपवून घेतला जाणार नाहीच. समर्थन करणाऱ्यांच्या डोक्यात प्रकाश पडो एव्हढी सदिच्छा आहे,” असा टोला अप्रत्यक्षपणे चित्रा वाघ यांनी सुषमा अंधारेंना लगावला आहे.