अहमदनगरच्या फकीरवाडा भागात रविवारी (०३ जून) संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाचे पोस्टर झळकावत काही तरुणांनी नाच केला. तसेच या मिरवणुकीत त्यांनी घोषणाबाजी केल्याचाही आरोप केला जात आहे. या घटनेवरून राज्यातलं वातावरण तापलं आहे. त्यापाठोपाठ कोल्हापुरातही मोठा राडा झाला आहे. सोशल मीडिया अकाऊंटच्या स्टेटसवर औरंगजेबाचा फोटो ठेवून औरंगजेबाचे उदात्तीकरण करणारा मजकूर शेअर करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांनी बुधवारी कोल्हापूर बंदची हाक दिली. तसेच कोल्हापुरात या घटनेमुळे अनेक ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. या दोन्ही घटनांवरून राज्यातले सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत.
भाजपाच्या महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या दोन्ही घटनांवरून महाविकास आघाडीकडे बोट दाखवलं आहे. चित्रा वाघ यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, राज्यात अचानक औरंग्याची पैदास वाढू लागली आहे. ती ज्यांनी जन्माला घातली आहे त्यांचा म्हणजेच महाविकास आघाडीचा आणि औरंगजेबाचा डीएनए एकच असावा. अन्यथा काही तरूणांनी औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याप्रकरणी राज्यातील परिस्थिती संवेदनशील असताना महाविकास आघाडीच्या वाचाळवीरांकडून दंगे भडकवण्याचं काम झालं नसतं.
चित्रा वाघ म्हणाल्या, हे सगळं ठरवून केलं जात आहे. यासाठी त्यांनी कट केला आहे. परंतु हे सगळं जनता पाहतेय. ‘ये पब्लिक है, ये सब जानती हैं’. महाविकास आघाडीचे नेते सर्वज्ञानी संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाड यांनी तर खरंच आपला डीएनए एकदा टेस्ट करून घ्यावा.
हे ही वाचा >> VIDEO : केजरीवालांच्या भाषणादरम्यान विद्यार्थ्यांच्या ‘मोदी… मोदी’ घोषणा, मुख्यमंत्री हात जोडून म्हणाले…
चित्रा वाघ यांनी उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती केली आहे की, त्यांनी औरंग्याच्या औलादींचा बंदोबस्त करावा, ही निजामीवृत्ती आज ठेचली तरच कायमची अद्दल घडेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.