राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईवर गुजराती आणि राजस्थानी नागरिकांच्या वर्चस्वावर वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे त्यांच्यावर सर्व स्तरातून टीका केली जात आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्राच्या जनतेची जाहीर माफी मागावी तसेच त्यांना राज्यपाला पदावरून दूर करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. असे असताना भाजापाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी कोश्यारी यांच्या वक्त्व्यावर आपली भूमिका मांडली आहे.
हेही वाचा >>> राज्यपालांच्या विधानाने महाराष्ट्राचा काय अपमान झाला? त्यांचे समर्थन करतो- प्रकाश आंबेडकर
“मुंबईमध्ये राहणारा प्रत्येकजण मुंबईकर आहे. महाराष्ट्रात राहणारा प्रत्येकजण महाराष्ट्रीयन आहे. अशा अनुषंगाने आपण राज्यपालांच्या वक्तव्याकडे पाहिले पाहिजे. विरोधकांकडे बोलण्यासाठी दुसर विषय राहिलेला नाही. त्यामुळे अशा मुद्द्यांवर ते बोलत आहेत. २७ सेकंदांमध्ये ७० शिव्या देणारे सर्वज्ञानी कोणाला दिसत नाहीत. त्यांच्यावर बोलण्यासाठी कोणाची जीभ रेटत नाही. पण राज्यपाल जे बोलले त्याचा कसा विपर्यास करायचा यावर सगळ्याची जीभ रेटते हे बघायला मिळत आहे,” असे चित्रा वाघ टीव्ही ९ मराठीला बोलताना म्हणाल्या.
हेही वाचा >>> राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “मराठी माणसाच्या मेहनतीवरच…”
“राज्यपालांनी केलेले वक्तव्य वेगळ्या पद्धतीचे आहे. मात्र मुंबईमध्ये राहणारा प्रत्येकजण हा मुंबईकर आहे. आम्ही मुंबईमध्ये वाढलो आहोत. मुंबई, महाराष्ट्राला घडवण्यात सगळ्यांचा समावेश आहे. सर्वांचेच योगदान आहे, अशी भूमिका राज्यपालांनी मांडली. प्रत्येक पक्षात गुप्ता, वर्मा, शर्मा आहेतच. त्यामुळे सर्वजण मराठी म्हणूनच वावरतात,” असेही चित्रा वाघ म्हणाल्या.