मोहन अटाळकर, लोकसत्ता 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील अभ्यासक्रमांना पसंतीवर आधारित श्रेयांक पद्धत ‘सीबीसीएस’ (चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम) लागू करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. येत्या शैक्षणिक सत्रापासून यावर अंमल केला जाईल.

सर्व विषयांचे व परीक्षांचे अभ्यासक्रम तयार करण्यासाठी अभ्यास मंडळाच्या सलग दोन दिवस सभा आयोजित करण्यात आल्या. एकाच वेळी अभ्यास मंडळांचे सुमारे ४०० सदस्य अभ्यासक्रम तयार करण्यासाठी एकत्र आल्याचे चित्र दिसले. येत्या १ जुलैपासून नवीन अभ्यासक्रम लागू करावयाचा असल्यामुळे विद्यापीठात लगबग सुरू आहे.

मध्यंतरीच्या काळात शिक्षण, अध्यापन, परीक्षा व मूल्यांकन याबाबत ही पद्धत लागू करण्यासाठी आवश्यक असलेले निर्देश, अध्यादेश व विनियम यांनासुद्धा विद्या परिषदेने मान्यता प्रदान केली असून विद्यापीठ परिक्षेत्रातील सर्व संलग्नित महाविद्यालये व शैक्षणिक विभागांना सत्र २०२२-२३ पासून हा निर्णय लागू केला जाणार आहे.

अमरावती विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना रोजगारासाठी आवश्यक असलेली विविध कौशल्ये आत्मसात करण्यासाठी ‘सीबीसीएस’नुसार तयार होत असलेला अभ्यासक्रम महत्त्वाचा असून नवीन अभ्यासक्रम विद्यार्थ्यांना कौशल्याधिष्ठित करणारा असल्याचे मत कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे यांनी व्यक्त केले आहे.

विद्यापीठात सुधारणा करण्यास प्रचंड वाव आहे. अभ्यासक्रम तयार करणे आव्हानात्मक असून आपण ते आव्हान स्वीकारले आहे. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज असून तशाप्रकारचे प्रयत्न आपण सर्व करीत आहोत.  महाविद्यालयांनी महाराष्ट्रातील उत्कृष्ट महाविद्यालयांशी विद्यार्थी आदान-प्रदान करण्यासंदर्भात सामंजस्य करार करावा, त्यामुळे विद्यार्थ्यांना इतर महाविद्यालयातील चांगल्या गोष्टी शिकता येतील व त्यांना ज्ञान मिळेल. रोजगाराची अनेक क्षेत्रे आहेत, ती शोधण्याची सध्या गरज असून त्यानुरूप अभ्यासक्रम तयार झाल्यास आमच्या विद्यार्थ्यांना कौशल्ये मिळतील व त्याला रोजगार मिळविणे किंवा स्वत:चा उद्योग वा व्यवसाय सुरू करणे सहज शक्य होईल, असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले आहे.  बऱ्याच दिवसांपासून अभ्यासक्रम बदलले नव्हते, त्यामुळे अभ्यासक्रम बदलण्याची गरज होती. सीबीसीएस व एनईपीवर अनेक कार्यशाळांचे आयोजन विद्यापीठाने तसेच महाविद्यालयांनी सुद्धा केले. अभ्यास मंडळांच्या सदस्यांना सीबीसीएस प्रणाली समजावी आणि नवीन अभ्यासक्रम तयार करण्यासाठी मदत मिळावी, या हेतूने एकत्रित सभा घेण्यात आल्या. या सदस्यांच्या माध्यमातून पुढील महिन्यात पाचशे प्रशिक्षण कार्यक्रमाद्वारे सर्व शिक्षक, विद्यार्थी व समाजापर्यंत हा विषय पोहोचला जाईल. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, यासाठी अभ्यासक्रमात योग्य ते बदल होणे आवश्यक होते. यानिमित्ताने आमच्या विद्यार्थ्यांना रोजगाराची नवी दालने व संधी उपलब्ध होतील, असे मत कुलगुरूंनी व्यक्त केले आहे. विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा, यासाठी चांगले व अनुरूप अभ्यासक्रम अभ्यास मंडळाच्या सदस्यांना तयार करायचे आहेत. या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून रोजगाराची विपुल दालन तयार व्हायला हवीत. रोजगारासाठी सक्षम विद्यार्थी आम्हाला घडवायचा आहे, असे प्र-कुलगुरू डॉ. व्ही.एस. चौबे यांचे म्हणणे आहे.

अमरावती विद्यापीठात ४८ अभ्यास मंडळे असून त्या अभ्यास मंडळाचे ४०० सदस्य दोन दिवस विद्यापीठ परिसरात उपस्थित होते.  अभ्यास मंडळाच्या सभांसाठी २७ ठिकाणी बैठक व्यवस्था करण्यात आली होती. सदस्यांच्या जेवणाची व निवासाची व्यवस्थासुद्धा परिसरात करण्यात आली होती. अभ्यास मंडळांनी अभ्यासक्रम तयार केल्यानंतर त्याच्या शिफारसी मान्यतेसाठी फॅकल्टी व त्यानंतर विद्या परिषदेकडे जाणार आहेत.

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात सीबीसीएस लागू करण्याचा विद्या परिषदेने निर्णय घेतला असून त्यानुसार नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या तरतुदीच्या अनुषंगाने  सर्वच शाखांतील अभ्यासक्रम सुधारणांबाबत विद्यापीठाने क्रांतिकारक व ऐतिहासिक पाऊल उचलले असून येत्या शैक्षणिक सत्र २०२२ पासून अभ्यासक्रम लागू करण्याच्या दृष्टीने नव्याने अभ्यासक्रम तयार होतील.

डॉ. दिलीप मालखेडे, कुलगुरू, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Choice based credit system at amravati university zws