रायगड जिल्ह्यातील १९१ ग्रामपंचायतींसाठी रविवारी मतदान प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीत मतदारांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळाला. मुरुड तालुक्यातील कोर्लई येथील ख्रिश्चन मुलीने लग्नाआधी मतदान केंद्रावर जाऊन मतदान केले. तर पोलादपूर येथे सेहरा बांधून दुल्हा मतदानाला पोहोचला.
मुरुड तालुक्यातील कोर्लई ग्रामपंचायतीमध्ये सार्वत्रिक निवडणूक १८ डिसेंबर रोजी झाली ,या दिवशीच कोर्लई ख्रिश्चन पाडा येथील युवतीचे लग्नकार्य निश्चित होते. मात्र या युवतीने लग्नाच्या आधी मतदानाचा हक्क बजावला. तिचे कौतुक कोर्लई ग्रामपंचायतीमधील मतदार व उमेदवार यांनी व्यक्त केले. कोर्लई ख्रिश्चन पाडा येथील सबस्टिअन इनअस वेगस यांची मुलगी लारिसा हिचा विवाह दि. १८ डिसेंबर रोजी सक्रेड हार्ट चर्च रोहा-वरसे येथे सकाळी साडेदहा वाजता नियोजित होता; परंतु विवाहस्थळी प्रस्थान करण्यापूर्वीच लारिसा हिने कोर्लई ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क येथील राजिप शाळा मतदान केंद्रावर जाऊन बजावला.
तर पोलादपूर तालुक्यातील कालवली येथे दुल्हे का सेहरा बांधून मुनाफ खलफे याने मतदानाचे कर्तव्य बजावले. आधी मतदान करून नंतर ते लग्न सोहळय़ासाठी रवाना झाले. या वेळी उपस्थित पोलीस कर्मचारी वर्ग व शासकीय कर्मचारी वर्ग यांनी तिचे कौतुक केले.