अहमदनगर जिल्हयात झालेल्या चारा घोटाळ्याची राज्य गुन्हे अन्वेषण(सीआयडी) विभागामार्फत चौकशी करण्याची घोषणा मदत आणि पुनर्वनसमंत्री पंतगराव कदम यांनी बुधवारी विधान परिषदेत केली.
विधान परिषदेत दुष्काळावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी या घोटाळ्याचा आरोप केला. नगर जिल्हयातील कर्जत तालुक्यात काही भागासाठी मंत्र्यांच्या कार्यकर्त्यांनी कागदोपत्री टनावारी चारा आणून लाखो रुपयांची बिले काढली. हा चारा त्यांनी ठाणे, कल्याण, पुणे, रत्नागिरी येथून ट्रकमधून आणल्याच्या नोंदी असल्या तरी गाडय़ांचे जे नंबर आहेत ते लुना, स्कुटी, मारुती आणि जेसीबीचे आहेत, असे तावडे म्हणाले. त्याची दखल घेत सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले. दोषींवर कठोर कारवाईची हमी गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.