लातूर : लातूर शहर महानगरपालिका ही महिलांना मोफत शहर बस सेवा देणारी देशातील पहिली महानगरपालिका आहे. वास्तविक महानगरपालिकेची आर्थिक स्थिती पाहता हा निर्णय घेणे महानगरपालिकेला परवडत नाही. २०२४ अखेरपर्यंतच्या आर्थिक वर्षात ६९ लाख २३ हजार ७०५ रुपये निधी यासाठी खर्च झाला मात्र हा निर्णय पुढील वर्षासाठीही सुरूच राहणार असून महिला सुरक्षेच्या दृष्टीने ही सुविधा लातूर मनपाच्या वतीने देण्यात येत असल्याची माहिती मनपा आयुक्त व प्रशासक बाबासाहेब मनोहरे यांनी दिली.

२०२५-२६ चा अर्थसंकल्प सादर करताना मनोहरे बोलत होते .कसलीही करवाढ न करता १७ लाख रुपयाचे शिलकी अंदाजपत्रक लातूर मनपाने सादर केले आहे. १ हजार ६४ कोटी सात लाख रुपये अंदाजीत जमा अपेक्षित असून अपेक्षित खर्च १ हजार ६३ कोटी ९० लाख आहे.

लातूर शहरातील पाणीपुरवठ्याचे टप्पा दोन चे काम मंजूर होण्याच्या प्रतीक्षेत असून दोन वर्षात हे काम पूर्ण झाले तर शहरवासीयांना सध्या आठवड्यातून दोन वेळेस पाणी दिले जाते त्यानंतर ते कदाचित दररोजही देता येईल असे मनोहरे यांनी सांगितले. शहरात मोफत बस सेवेचा लाभ घेत असताना महिलांना मोफत स्मार्ट कार्ड वितरित केले जाणार आहे त्याचा लाभ घेऊन महिलांनी स्मार्ट कार्ड वापरात आणण्याचे आवाहन त्यांनी केले.

घनकचरा व्यवस्थापनात नव्याने निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली असून दररोज १५० मे. टन कचऱ्यावर प्रक्रिया केली जात आहे. या कचऱ्यापासून खत व विजेची निर्मिती केली जात आहे. मालमत्ता विभागामार्फत शहरात वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी वाहनतळ व्यवस्था करण्यात आली आहे. शहर महानगरपालिकेमार्फत चालवल्या जात असलेल्या शाळांचे सक्षमीकरण करण्यात येत आहे सर्व शाळांना शैक्षणिक साहित्य व डिजिटल साहित्य दिले जाईल.

सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येतील व दरमहा गुणवत्ता चाचणीचे आयोजन केले जाणार असल्याचेही ते म्हणाले. हवेची गुणवत्ता चांगली रहावी यासाठी शहरांमध्ये मध्यरात्री मुख्य रस्त्यावर पाण्याचे फवारे सोडले जाणार आहेत त्यातून हवेतील धुलीकण कमी होतील .गेल्या चार महिन्यापासून हा उपक्रम सुरू असल्याचेही मनोहरे यांनी सांगितले. शहरात बंदिस्त गटार योजनेचे काम सुरू असून आगामी वर्षभरात हे काम पूर्ण होऊन गटारातील पाण्यावर प्रक्रियाही केली जाऊन पाण्याचा पुनर्वापर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. स्वच्छ लातूर अभियान राबवले जात असून या अभियानांतर्गत नागरिकांनी सहभाग द्यावा व लातूर पुन्हा एकदा स्वच्छ अभियानात देशातील नामवंत महानगरपालिकेमध्ये गाजेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. अर्थसंकल्प सादर करताना उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे व अन्य सहाय्यक उपायुक्त उपस्थित होते.