राष्ट्रवादीची चौकशीची मागणी
राज्यात तूरडाळीचे दर २००चा टप्पा ओलांडून गेले असताना तिचा साठा करणाऱ्या कंपनीला अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी गुपचूप भेट दिल्याचे स्पष्ट झाले आहे. या कंपनीवर अन्न व नागरी पुरवठा विभागाने अलीकडेच छापा टाकून तब्बल ५५ कोटी रुपयांची डाळ जप्त केली होती. बापट यांच्या या दौऱ्याबाबत कमालीची गोपनीयता बाळगण्यात आली होती.
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी मंगळवारी खालापूर तालुक्यातील रानसई येथे असलेल्या ईटीसी अ‍ॅग्रो या कंपनीला भेट दिली. त्यांच्यासोबत यावेळी कोणताही शासकीय ताफा नव्हता. हा दौरा अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याने उलट-सुलट चर्चा सुरू आहे. या गुप्त भेटीची चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार सुरेश लाड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.
बापट यांच्या या दौऱ्याची कुणकूण लागताच स्थानिक पत्रकारांनी त्यांना गाठले. यावेळी मात्र त्यांनी सारवासारव करून राज्यातील डाळीचे भाव स्थिर राहावेत व बाजारात डाळीची आवक वाढावी असा आपला प्रयत्न असून त्या दृष्टीने ही भेट असल्याचे त्यांनी सांगितले.
राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या छाप्यात पकडलेली २४ हजार मेट्रिक टन तूर डाळ हस्तगत करण्यात आली आहे. या तुरीवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. खालापुरच्या या कंपनीत एकाच वेळी १२० ते १४० मेट्रिक टन डाळीवर प्रक्रिया करता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन या कंपनीला आपण भेट दिली असल्याचे बापट यांनी स्पष्ट केले.
यानंतर त्यांनी खालापूर येथील मयुरेश प्रोटीन्स या कंपनीला भेट दिली. सहा वर्षांपूर्वी या कंपनीवरही बेकायदा तूर आणि धान्यसाठा केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली हेती. या भेटीवेळी मात्र शासकीय अधिकाऱ्यांना बोलवून घेण्यात आले.

राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी टाकलेल्या धाडीत पकडलेली २४ हजार मेट्रिक टन तूरडाळ जप्त करण्यात आली आहे. या तुरीवर प्रक्रिया करणे गरजेचे आहे. खालापूरच्या या कंपनीत एकाच वेळी १२० ते १४० मेट्रिक टन डाळीवर प्रक्रिया करता येऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन या कंपनीला भेट दिली.
– गिरीश बापट, अन्न व नागरी पुरवठा मंत्री

Story img Loader