रखडलेल्या ऊस देयकाच्या प्रश्नावरून चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत उत्पादकांनी गोंधळ घालून अध्यक्षांसह संचालक मंडळाला धारेवर धरले. सात दिवसांत देयकाची रक्कम न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशाराही एका सभासदाने दिला.
धोंडूअप्पानगर या कार्यस्थळावर कारखान्याची २४ वी वार्षिक सभा अध्यक्ष डॉ. सुरेश पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. याप्रसंगी माजी आमदार कैलास पाटील, दिलीप सोनवणे, गोरखतात्या पाटील, उपाध्यक्ष चंद्रहास गुजराथी आदी उपस्थित होते. इतिवृत्तास मंजुरी दिल्यानंतर मधुकर बावीस्कर यांनी चोसाका संचालक व तापी पतपेढीचे अध्यक्ष डॉ. सुरेश बोराले यांचे संचालक पद रद्द का केले नाही, असा प्रश्न उपस्थित केला. त्या संदर्भातील प्रस्ताव साखर आयुक्तांना पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले. कारखान्याला यंदाच्या हंगामात पाच कोटींचा तोटा झाल्याचे अध्यक्ष पाटील यांनी सांगितले. अंतरिम कर्ज मंजूर झाल्याशिवाय उत्पादकांना पैसा देता येणार नाही. साखरेच्या भावात घसरण झाल्याने कारखाना अडचणीत आला आहे. कारखान्याने बुलढाणा अर्बन सोसायटीकडे उसाची देयके देण्यासाठी कर्ज मागणी केली असून, ती रक्कम मिळताच शेतकऱ्यांना अदा केली जाईल, असे पाटील यांनी सांगितले. कारखान्याचे गाळप व कार्यक्षमता यांचे समीकरण जुळत नसल्याने प्रकल्पाचा भविष्यकाळ अंधकारमय असल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला. या निवेदनामुळे उत्पादक संतप्त झाले. १५ फेब्रुवारीनंतर कारखान्याला ऊस देणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप देयके दिली जात नसल्याच्या मुद्दय़ावरून त्यांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. या वेळी माजी सरपंच गोकुळ पाटील यांनी सात दिवसांत देयके न मिळाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा दिला.