शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे ग्रामविकासमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील एका कार्यक्रमात “स्त्रीरोग तज्ज्ञ कधीच हातपाय बघत नाही आणि हातपाय बघणारे कधीच स्त्री रोगतज्ज्ञ होऊ शकत नाही,” असं वक्तव्य केलं होतं. यावरून जोरदार वाद झाला. महाविकासआघाडीतील अनेक नेत्यांनी या वक्तव्यावर आक्षेप घेत सडकून टीका केली. जळगाव शिवसेनेने महापालिकेसमोर गुलाबराव पाटलांची प्रतिमा दहन करत जोरदार घोषणाबाजी केली आणि या वक्तव्याचा निषेध केला. या वादानंतर आता गुलाबराव पाटील यांनी त्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
गुलाबराव पाटील म्हणाले, “माझ्याविरोधात आंदोलन करणं हास्यास्पद आहे. ज्या चॅनलने ही बातमी दाखवली त्यांच्याविरोधात मी हक्कभंग मांडणार आहे. माझ्या भाषणाचा विपर्यास करून बातमी दाखवणे गुन्हा आहे. त्यांनी हे सिद्ध करून दाखवावं. माझ्याकडे माझ्या १०० भाषणांच्या कॅसेट आहेत.”
“मी एवढंच म्हटलं की ऑर्थोपेडीक डॉक्टर स्त्रियांच्या आजाराला तपासू शकत नाही”
“मी एवढंच म्हटलं की ऑर्थोपेडीक डॉक्टर स्त्रियांच्या आजाराला तपासू शकत नाही, स्त्रीरोगतज्ज्ञ ऑर्थोपेडीक रुग्णाला तपासू शकत नाही. अस्थीरोगतज्ज्ञ बालरोगाच्या रुग्णाला तपासू शकत नाही. आमचं म्हणणं आहे की आमचं कामही डॉक्टरप्रमाणेच आहे. आम्ही जनरल फिजीशियन आहोत.”
“उगाच हा चुकीचा अर्थ काढून आंदोलन करण्याचा प्रयत्न”
“आमच्याकडे येणारा माणूस कोणत्या विभागाची समस्या घेऊन आला हे आम्हाला माहिती नसतं. अशाप्रकारची कामं आम्हाला करावी लागतात. त्यांनी उगाच हा चुकीचा अर्थ काढून आंदोलन करण्याचा प्रयत्न केला आहे. कोणत्याही डॉक्टरांविषयी बोलण्याचा प्रश्नच नाही,” असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.
“कोणत्याही माणसाच्या करियरमध्ये अडचण येईल अशा बातम्या दाखवू नये”
“मी १०० वेळा हे भाषणात बोललो आहे. या आंदोलनाला काही महत्त्व नाही. मात्र, ज्यांनी ही बातमी दाखवली त्या चॅनलच्या प्रमुख संपादकांना विनंती आहे की अशा लोकांकडून येणाऱ्या बातम्या तपासून टाकल्या पाहिजे. कोणत्याही माणसाच्या करियरमध्ये अडचण येईल अशा बातम्या दाखवू नये हीच आमची अपेक्षा आहे,” असंही पाटलांनी नमूद केलं.
“५० खोके, एकदम ओके हे म्हणणं चुकीचं नाही”
५० खोके, एकदम ओके या वक्तव्यावर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “माझ्याविरोधात ५० खोके, एकदम ओके यावरूनही टीका होतेय. मी भाषणात बोललो, आमचं सध्या काय चाललं आहे तर ५० खोके एकदम ओके. हे म्हणणं चुकीचं नाही.”
“संजय राऊतांना आम्ही ४१ मतं देऊन निवडून दिलं, किती खोके मिळाले?”
“ज्या संजय राऊतांना आम्ही निवडून दिलं, त्यांना ४१ मतं मिळाली. किती खोके मिळाले? आम्ही आमदारकीला २६-२६ मतं दोघांना दिली. त्यावेळी आम्ही कोणते पैसे घेतले. आम्ही मतदान केलं आणि तरी तुम्ही आमच्यावर ‘५० खोके, एकदम ओके’ असे आरोप करत असाल तर मग मी म्हटलं ठीक आहे सगळं ओके तर ओके,” असं गुलाबराव पाटलांनी सांगितलं.