राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नवाब मलिक गुरुवारी (७ डिसेंबर) हिवाळी अधिवेशनानिमित्त विधानसभेच्या कामकाजात सहभागी झाले. मलिक विधीमंडळात कोणत्या बाकावर (सत्ताधारी/विरोधी) बसणार असा प्रश्न सर्वांना पडला होता. कारण नवाब मलिक तुरुंगात असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दोन गट पडले आहेत. ते तुरुंगातून परतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्या गटात (अजित पवार आणि शरद पवार) जाणार याबाबतही वेगवेगळ्या चर्चा चालू होत्या. आज विधानसभेत ते नेमके कुठे बसणार यावरून वेगवेळे तर्क-वितर्क लावले जात होते. परंतु, नवाब मलिक आज विधानसभेत सत्ताधारी बाकावर अजित पवार गटातील नेत्यांबरोबर बसले. याचे विधानपरिषदेत तीव्र पडसाद उमटले. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावरून सरकारला धारेवर धरलं. दानवे उपमुख्यमंत्री फडणवीसांना म्हणाले, ज्याचे दाऊद इब्राहिमशी संबंध जोडले, ज्याला देशद्रोही म्हटलं त्याच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसलेले आहात.
दानवे यांच्या प्रश्नांनंतर विधान परिषदेत देवेंद्र फडणवीसांनी सरकारची बाजू रेटून मांडली असली तरी विधीमंडळाचं कामकाज संपल्यानंतर त्यांनी एक पाऊल मागे घेतल्याचं पाहायला मिळत आहे. नवाब मलिक प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, “माजी मंत्री आणि विधानसभा सदस्य नवाब मलिक हे आज विधीमंडळ परिसरात येऊन कामकाजात सहभागी झाले होते. ज्या पद्धतीचे आरोप त्यांच्यावर आहेत, ते पाहता, त्यांना महायुतीमध्ये घेणे योग्य ठरणार नाही, असे आमचे मत आहे. मलिक हे सध्या केवळ वैद्यकीय कारणांच्या आधारावर जामीन मिळाल्याने तुरुंगाबाहेर आहेत. त्यांच्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास आपण (अजित पवार गटाने) त्यांचे जरूर स्वागत करावे. मात्र अशा प्रकारचे आरोप असताना त्यांना महायुतीचा भाग करणे, हे योग्य नाही, असे आमचे स्पष्ट मत आहे.
हे ही वाचा >> ‘नवाब मलिक यांना महायुतीत घेणे योग्य नाही’, फडणवीस यांचे अजित पवारांना पत्र; म्हणाले, “आमची वैयक्तिक शत्रूता…”
नवाब मलिकांच्या अजित पवार गटातील प्रवेशावर देवेंद्र फडणवीस यांनी विरोध दर्शवल्यानंतर भाजपा आणि शिवसेनेच्या शिंदे गटातील नेत्यांनीही याबाबत आपापल्या भूमिका मांडल्या आहेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी शिरसाट म्हणाले, एखाद्या व्यक्तीवर इतक्या गंभीर स्वरुपाचे आरोप असून त्यांना अटकही झालेली आहे. ते विधानसभेत सत्ताधारी बाकावर बसले म्हणजे आम्ही त्यांना स्वीकारलं अशी भावना सर्वसामान्य जनतेची झाली आहे. त्यांना आपल्या पक्षात घेण्याबाबतचा निर्णय अजित पवारांचा असला तरी तो निर्णय कशा पद्धतीने घेतात हे महत्त्वाचं आहे. हा सगळा अजित पवारांचा विषय असला तरी त्यांच्यामुळे लोकांमध्ये संभ्रम निर्माण होईल असं कृत्य घडता कामा नये.