देवळा तालुक्यातील वासोळ येथे मुलीची छेड काढल्याचा जाब विचारल्याच्या कारणावरून एका गटाने घराची तोडफोड करत वडिलांना बेदम मारहाण करून पावणेतीन लाख रुपयांची रक्कम लंपास केल्याची तक्रार देण्यात आली आहे. दुसऱ्या गटाने मुलीचे वडील आणि नातेवाइकांविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तक्रार दिली. यावरून दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे देवळा तालुका पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. आपली मुलगी परीक्षा देऊन घरी निघाली असताना गौतम कापडणेने तिची छेड काढली. त्याला समजावून सांगण्याचा राग आल्याने प्रल्हाद केदारे, सुरेश केदारे, योगेश केदारे, राहुल केदारे, रोहित केदारे, अनिल गायकवाड, बबलू केदारे, पिनू केदारे, अरुण केदारे, कमलाकर केदारे आदींनी लाठय़ाकाठय़ांनी वडील रवींद्र अहिरे, आई ऊर्मिलाबाई, आजोबा विठ्ठल अशांना मारहाण केली. घराची मोडतोड केली. कपाटातील दोन लाख ८० हजार रुपये काढून नेले, असे तक्रारीत युवतीने म्हटले आहे. याप्रकरणी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या गटाने पहिल्या गटाविरुद्ध जातिवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार दिली आहे. दहावीच्या परीक्षेत मुलीला कॉपी द्यावी, असे संबंधितांनी सांगितले. त्यास नकार दिल्यावर १० ते १५ जणांनी मारहाण केली. या वेळी तीक्ष्ण हत्यारांचा वापर करण्यात आला, असे तक्रारीत म्हटले आहे. यावरून अंकुश महाले, नारायण पगार, अर्जुन पगार, बाजीराव बच्छाव, दीपक बच्छाव, गोरख भामरे, दीपक पवार, साहेबराव पगार आदी १७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader