भाजपाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी जिल्हा बँक निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून चुकीच्या पध्दतीने प्रक्रिया राबवली गेल्याचा आरोप करत मतदानाच्या काही तास अगोदर निवडणुकीवर बहिष्काराची घोषणा केली होती. मात्र शनिवारी प्रत्यक्ष मतदान केंद्रावर भाजपाचे कार्यकर्ते व नेतेही काही ठिकाणी दिसून आले. तर परळी शहरातील औद्योगिक वसाहत केंद्रावर तर भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यात मारहाण झाल्याची घटना घडली. त्यानंतर पंकजा मुंडे यांच्यासह दोन्ही पक्षाचे दिग्गज नेते काही वेळातच या केंद्रावर दाखल झाले.  ११ मतदान केंद्रावर शांततेत मतदान झाले.

बीड जिल्ह्यात शनिवार आज (शनिवार)  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या १९ पैकी ८ जागांसाठी मतदान झाले. ४१ उमेदवार निवडणुक रिंगणात होते. भाजपाकडून बँक काढून घेण्यासाठी पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी राजकीय कौशल्य पणाला लावून भाजपाची पुरती कोंडी केली. अखेरीस मतदानाच्या एकदिवस अगोदर भाजपाच्या पंकजा मुंडे यांनी निवडणुकीवरच बहिष्कार घालण्याची घोषणा केल्याने राष्ट्रवादीसाठी निवडणुक एकतर्फी झाली. ऐनवेळी सत्तेचा गैरवापराचा आरोप करुन निवडणुकीवर बहिष्कार टाकून माघार घेणे हा पळपुटेपणा असल्याचा पलटवार धनंजय मुंडे यांनी केला. तर शिवसेनेचे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर गटाने या निवडणुकीपासून अलिप्त राहण्याची भूमिका घेतली.

आज पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी परळीत, आमदार संजय दौंड यांनी अंबाजोगाईत, माजी आमदार अमरसिंह पंडित, विजयसिंह पंडित यांनी गेवराईत तर सुशिला मोराळे, रविंद्र दळवी यांनी बीडमध्ये मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान परळी येथील औद्योगिक वसाहत मतदान केंद्रावर सायंकाळी चार वाजता वेळ संपल्यानंतर भाजपा आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. घटनेची माहिती मिळताच पंकजा मुंडे यांनी घटनास्थळी येऊन राष्ट्रवादीच्या गुंडगिरीचा निषेध नोंदवला.

अकरा केंद्रांवर झाले मतदान
बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक पदाच्या ८ जागांसाठी शनिवारी ११ केंद्रांवर मतदान झाले. सकाळी ८ पासून दुपारी ४ वाजेपर्यंत बीड येथील केंद्रावर १७०, गेवराई १६५, वडवणी ३२, माजलगाव ७३, धारुर ३४, केज ५२, परळी ५६, अंबाजोगाई ८३, शिरुर ५३, पाटोदा ३२, आष्टीत ५६ मतदारांनी हक्क बजावला.

Story img Loader