लोकसत्ता प्रतिनिधी

सांगली : जिल्ह्यातील ५१ केंद्रावर आजपासून बारावीची परीक्षा सुरू झाली असून या वर्षी जिल्ह्यातील ३२ हजार ५०९ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षा हे यावर्षी परीक्षा मंडळाने धोरण आखले असून जिल्ह्यातील ४ परीक्षा केंद्रावर करडी नजर राहणार आहे. परीक्षेवेळी गैर प्रकार रोखण्यासाठी चाळीस भरारी पथके तैनात करण्यात आली आहेत.

आजपासून इंग्रजी विषयाच्या पेपरने बारावीची परीक्षा सुरू झाली. परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावरच ओळखपत्र पाहून परीक्षेच्या कक्षात प्रवेश देण्यात आला होता. परीक्षा १८ मार्च पर्यंत सुरू राहणार असून परीक्षा पारदर्शक, कॉपीमुक्त पार पाडण्याचा शिक्षण मंडळाचा प्रयत्न आहे. यासाठी तयारी करण्यात आली असून वादग्रस्त असलेल्या ४ परीक्षा केंद्रावर करडी नजर ठेवण्यात आली आहे. या ठिकाणी परीक्षा यंत्रणेत कार्यरत असलेल्या कर्मचार्‍यांची अदलाबदल करण्यात आली आहे. सामुहिक कॉपीचा प्रकार आढळल्यास शिक्षण संस्थेची मान्यता रद्द करण्याचा इशारा परीक्षा मंडळाने दिला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, परीक्षा पारदर्शी पार पडाव्यात आणि नक्कल होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी जिल्ह्यात ४० भरारी पथके नियुक्त करण्यात आली आहेत. यामध्ये शिक्षण विभागातील अधिकारी, गटविकास अधिकारी, तहसिलदार, जिल्हा परिषदेचे खाते प्रमुख आदींचा समावेश आहे.