रायगड किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटक शिवप्रेमींसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. मराठा साम्राज्याच्या राजधानी असलेल्या किल्ले रायगडावर आता शुद्ध आणि थंड पाण्याचा पुरवठा होणार आहे. हिरवळ प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेच्या वतीने किल्ल्यावर हा जलशुद्धीकरण आणि शीतलीकरण प्रकल्प राबविला जाणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्थापन केलेल्या िहदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडबद्दल देश विदेशातील पर्यटकांना आकर्षण राहिले आहे.
देशभरातील लाखो शिवप्रेमी आणि गडप्रेमी, पर्यटक या किल्ल्याला दरवर्षी भेट देत असतात. विशेषत: शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्याने रायगडावर हजारो शिवप्रेमी दाखल होत असतात.
या किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना तेथे पिण्याच्या पाण्याची सुविधा १९६७ मध्येच जीवन प्राधिकरणाने केली होती. काळा हौद, कोळीम तलाव आणि गंगासागर तलाव येथून नळपाणीपुरवठा योजना राबविण्यात आली. त्यासाठी जगदीश्वर मंदिराजवळ २० हजार लीटर क्षमतेची दगडी साठवण टाकी बांधण्यात आली होती परंतु ती आता कार्यान्वित नाही. या ठिकाणी तलावांच्या पाण्याशिवाय दुसरा कोणताही स्रोत नाही.
सद्य:स्थितीत गंगासागर तलावातून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. महत्त्वाचे म्हणजे या तलावातून पुरवले जाणारे पाणी अशुद्ध असल्याचे वेळोवेळी निदर्शनास आले आहे. हिबाब लक्षात घेऊन रायगड जिल्हा परिषदेने या योजनेवर ऑनलाइन फिल्टरेशन प्लॅण्ट बसविला. शुद्धीकरणाबरोबरच या पाण्याचे क्लोरिनेशनही केले जाते. रायगड जिल्हा परिषदेने स्वनिधीतून ही योजना राबवली असून या कामासाठी ३ लाख ४३ हजार रुपये इतका खर्च आला होता. मात्र हा जलशुद्धीकरण प्रकल्क केवळ शिवराज्याभिषेक सोहळा, शिवपुण्यतिथी आणि शिवजयंती उत्सव या कालावधीतच कार्यरत असायचा. त्यामुळे एरवी गडावर येणारया पर्यटकांची मोठी गरसोय होत होती.
आता हिरवळ प्रतिष्ठानच्या माध्यमातून किल्ले रायगडावर बाराही महिने मोफत शुद्ध आणि शीतल पाणीपुरवठा उपलब्ध होऊ शकणार आहे. येत्या २८ मे रोजी सकाळी १० वाजता या जलशुद्धीकरण आणि शीतलीकरण प्रकल्पाचे लोकार्पण केले जाणार आहे. या कार्यक्रमास कोकण आयुक्त तानाजी सत्रे, जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे आणि आमदार भरत गोगावले उपस्थीत राहणार आहे. एका दिवसाला तब्बल ४ हजार लिटर पाणी फिल्टर करण्याची या प्रकल्पाची क्षमता असणार आहे.
प्लास्टिक बाटल्यांमुळे गडावर कचऱ्याची समस्या आणि पर्यावरणाचा ऱ्हास होत होता. शिवप्रेमींना महागडे पाणी विकत घ्यावे लागत होते. या सामाजिक जाणिवेतून गडावर हा प्रकल्प उभारण्याचा निर्णय हिरवळ प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आल्याचे संयोजक किशोर धारिया यांनी सांगितले.