एसटी महामंडळातर्फे आता राज्यात सर्व एसटी आगारातील स्वच्छतेसाठी खासगी कंपनीला साडेचारशे कोटींचे कंत्राट दिले असून त्यामुळे स्थानिक बेरोजगार, मजूर सहकारी संस्थांना मिळणारे हे काम पुढील महिन्यापासून बंद होणार आहे. विशेष म्हणजे या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व आगारांच्या स्वच्छतेसाठी दरमहिना होणारा खर्च फक्त एका आगाराच्या स्वच्छतेसाठी लागणार आहे. त्यामुळे महामंडळावर कोट्यवधींचा नवा बोजा पडणार आहे. त्याचप्रमाणे कुरीअर सेवेचे कंत्राट रद्द करून त्याची जबाबदारीही एसटीने स्वतच्या कर्मचाऱ्यांकडून पार पाडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळावर हे अतिरिक्त काम येऊन पडण्याचे स्पष्ट संकेत आहेत.

यावर्षी ऑक्टोबरमध्ये ब्रिग्झ कंपनीला राज्यातील सर्व आगारांच्या स्वच्छतेचे कंत्राट देण्यात आले आहे. यापूर्वी जिल्हा स्तरावरील स्थानिक बेरोजगार, मजूर सहकारी संस्थांकडून या कंत्राटासाठी निविदा मागवल्या जात होत्या. त्यातही या कंत्राटाची रक्कम गुणानुसार अदा करण्याचा निकष ठेवण्यात आला होता. यामध्ये आगार परिसरातील स्वच्छतेच्या विविध कामांसाठी वेगवेगळे गुण ठरविण्यात आले होते. त्यानुसार अधिकाऱ्यांकडून आगारातील गुण निश्चित करण्या आल्यानंतर संबंधित संस्थांना रक्कम अदा करण्यात येत असे. त्यामुळे रत्नागिरीसारख्या एका जिल्ह्यातील स्वच्छतेवरील खर्च दरमहिना अडिच ते तीन लाखांपर्यंत मर्यादित राहायचा. पण आता नवीन राज्यस्तरीय कंत्राटानुसार एवढा खर्च एका आगारावरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. राज्यातील एसटी आगारांच्या स्वच्छतेसाठी 445 कोटी रूपयांचे हे कंत्राट असून या वर्षांअखेपर्यंत याची अंमलबजाववणी सर्व आगारात होणार आहे. सध्या अनेक आगारांमध्ये संबंधित कंपनीकडून कर्मचारी भरती प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये वयोमर्यादा ठेवण्यात आल्याने वर्षोनुवष्रे काम करणारे जुने कर्मचारी अपात्र ठरले आहेत. त्याचा मोठा फटका या जुन्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना बसला असून या कर्मचाऱ्यांवर अचानक बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. विशेष म्हणजे नवीन कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून महिना आठ हजार रूपये मानधन मिळणार आहे.

दरम्यान, एसटीमार्फत कुरीअर सेवा देणाऱ्या अंकल कंपनीचे कंत्राटही नियम उल्लंघन केल्याप्रकरणी रद्द करण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. १८ डिसेंबरपसून हे कंत्राट रद्द झाले असून या तारखेपर्यंत आलेले पार्सल २२ तारखेपर्यंत  संबंधित ठिकाणी पोच करण्याची मुदत अंकल कुरीअरला देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही कुरीअर सेवा आता एसटी महामंडळाकडूनच चालविण्यात येणार आहे. गेली पंधरा वष्रे खासगी कंपन्यांमार्पत ही सेवा देण्यात येत होती. मात्र आता अपुऱ्या मनुष्यबळाच्या समस्येने ग्रासलेले एसटी महामंडळ या कुरीअर सेवेसाठी कर्मचाऱ्यांची कशी व्यवस्था करणार, हा प्रश्न वरीष्ठ अधिकाऱ्यांना पडला आहे. मात्र नवनवीन निर्णय घेऊन एसटीला आíथक ओझ्याखाली आणणाऱ्या या धोरणामुळे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्यावर पुन्हा एसटी वर्तुळात टीकेची झोड उठली आहे.

Story img Loader