गेल्या काही दिवसांपासून हवामानात झालेल्या बदलामुळे कोकणच्या किनारपट्टीवरील मच्छीमारी थंडावली असून मोहोराची प्रतीक्षा असलेल्या आंब्याच्या उत्पादनालाही फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे.
यंदा पावसाळ्याचा जोर विशेष राहिला नव्हता, त्यामुळे ऑगस्टच्या मध्यानंतर मासेमारीला सर्वत्र मोठय़ा प्रमाणात सुरुवात झाली. दिवाळीपर्यंतच्या काळात यंदा उत्पादनाच्या दृष्टीने चांगला हंगाम असल्याची चर्चा असतानाच गेल्या आठवडय़ापासून हवामानामध्ये बदल जाणवू लागला. वाऱ्यांचा वेग वाढत असल्याचे लक्षात आल्यामुळे मच्छीमारांनी खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणे टाळले. त्यातच गेल्या शुक्रवारपासून (२० नोव्हेंबर) सर्वत्र हवामान ढगाळ होऊ लागले. जिल्ह्य़ाच्या काही भागांत पावसाच्या तुरळक सरीही पडल्या त्यामुळे मच्छीमारीवर आणखी विपरीत परिणाम झाला आहे.
दिवाळीपाठोपाठ येणाऱ्या थंडीमुळे आंब्याच्या झाडांना मोहोर दिसू लागतो. पण यंदा मात्र अनेक झाडांना नव्याने पालवी फुटत असून मोहोराचे प्रमाण अद्याप नगण्यच आहे. त्यामुळे आंब्याच्या वेळापत्रकावर परिणाम होण्याची भीती बागायतदारांकडून व्यक्त केली जात असून मोहोराची प्रक्रिया वाढण्यासाठी चांगल्या थंडीची प्रतीक्षा आहे.
कोकणात दिवाळीच्या सुमारास पावसाच्या तुरळक सरी पडणे स्वाभाविक मानले जाते. पण यंदा वाऱ्याचा वेग आणि जास्त दिवस टिकलेल्या ढगाळपणामुळे हवामानात बदल झाल्याचे संकेत मिळत आहेत. कोकणातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने महत्त्वाचे घटक असलेल्या मासे आणि आंब्याच्या उत्पादनांना त्याचा फटका बसत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा