विदर्भात पावसाळी स्थिती, पालघरमध्ये मुसळधार
पुणे, मुंबई, पालघर : अरबी समुद्राकडून वाहणारे वारे आणि मध्य प्रदेशापासून तमिळनाडूपर्यंत हवेच्या कमी दाबाच्या पट्टय़ामुळे राज्याच्या हवामानात झपाटय़ाने बदल होत आहेत. विदर्भात सध्या पावसाळी स्थिती असून, तेथे गारपिटीचा इशारा देण्यात आला आहे. इतर सर्वच ठिकाणी कमाल आणि किमान तापमानात घट झाली असून पालघर तालुक्यात शुक्रवारी अवकाळी पाऊस पडला. मुंबई-ठाणे-पुण्यात गेल्या दोन दिवसांपासून मळभ दाटून येत आहे. तर अनेक भागांत रात्री थंडगार वारे वाहत आहेत.
फेब्रुवारी महिन्याच्या शेवटीही राज्यात विचित्र हवामानाची स्थिती निर्माण झाली होती. मध्य महाराष्ट्रात थंड, कोकणात उकाडा, तर विदर्भ-मराठवाडय़ात पावसाळी स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर सर्वत्र कोरडय़ा हवामानाच्या स्थितीमुळे तापमानात वाढ सुरू झाली असतानाच समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानाची स्थिती बदलली आहे. सध्या विदर्भात वादळी पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे. ९ आणि १० मार्चला या भागात काही ठिकाणी सोसाटय़ाच्या वाऱ्यासह गारांचा पाऊस पडणार असल्याच्या इशारा हवामान विभागाने दिला आहे.
तापभान..
मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाडय़ातील दिवसाच्या कमाल तापमानामध्ये मोठी घट झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, बीड, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, रत्नागिरी, कोल्हापूर, नांदेड, नगर, जळगाव आदी ठिकाणी कमाल तापमान सरासरीच्या खाली गेले आहे. विदर्भाच्या तापमानातही घट नोंदविण्यात येत आहे. रात्रीच्या तापमानाचा पाराही घटल्याने रात्री आणि पहाटे थंडी जाणवत आहे. बोचऱ्या वाऱ्यांमुळे संध्याकाळपासूनच हवेत गारवा जाणवतो आहे. पुढील काही दिवसांत तापमानात अल्पशी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.
अवकाळी पाऊस.. पालघर तालुक्यात शुक्रवारी सकाळी अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे शेतकरी- बागायतदार, मीठ उत्पादक, वीटभट्टी, गवत व्यापारी, सुकी मासळी व्यावसायिक आणि इतर व्यावसायिकांची मुसळधार पावसामुळे तारांबळ उडाली. हा पाऊस नेमका शालांत परीक्षा देण्यासाठी निघणाऱ्या विद्यार्थ्यांच्या वेळेत सुरू झाल्याने परीक्षेला निघालेल्या विद्यार्थ्यांना काही प्रमाणात गैरसोयींना सामोरे जावे लागले.