नगर शहरातील अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या ऑटो व अ‍ॅपेरिक्षा बंद व्हाव्यात तसेच रिक्षा कल्याणकारी महामंडळाची त्वरित स्थापना करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा रिक्षा पंचायत संघटनेने केली असून, शिष्टमंडळाने या मागण्यांचे निवेदन आ. अरुण जगताप यांना दिले.
संघटनेचे ताजोद्दीन मोमीन, शाहू लंगोटे, केशव बरकते, अशोक औसीकर, रघुनाथ कापरे, उस्मान पठाण, विलास कराळे, नासीर पठाण, मुन्ना शेख, राज आठरे, दत्ता साबळे, विजय शेलार, महंमद शेख, धर्मा करांडे, लतीफ शेख यांच्या शिष्टमंडळाने मागणीचे निवेदन दिले.
या मागणीसाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, जिल्हा पोलीसप्रमुख, जिल्हाधिकारी यांना अनेक वेळा निवेदन देऊनही त्याची दखल घेतली गेली नाही, याकडे निवेदनात लक्ष वेधण्यात आले आहे. अवैध रिक्षांची वाहतूक बंद होत नसल्याने परवानाधारक रिक्षाचालकांवर अन्याय होत आहे व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे, तसेच रिक्षाच्या कर्जप्रकरणाचा बोजाही वाढतो आहे, असेही त्यात म्हटले आहे.
प्रशासनाच्या पातळीवर रिक्षा कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेची सर्व कायदेशीर प्रक्रिया सरकारच्या व प्रशासनाच्या पातळीवर पूर्ण झाली आहे, विधिमंडळाच्या अधिवेशनात हा प्रश्न उपस्थित करून महामंडळाची स्थापना करावी तसेच या महामंडळासाठी निधी उपलब्ध करावा, महामंडळामुळे रिक्षाचालकांच्या कुटुंबाचे शैक्षणिक, आर्थिक, आरोग्य, निवृत्तिवेतन यांसारखे प्रश्न सुटणार आहेत, त्यामुळे महामंडळाचा प्रश्न मार्गी लावावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Story img Loader