सांगली : छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणार्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची हकालपट्टी करावी या मागणीसाठी शुक्रवारी इस्लामपुरमध्ये बंद पाळण्यात आला. बहुजन महापुरूष सन्मान कृती समितीच्यावतीने पुकारलेल्या इस्लामपूर बंदला नागरिकांनीही उत्स्फुर्त पाठिंबा दिल्याने शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प झाले होते. राज्यपाल कोश्यारी यांनी महाराष्ट्राचे श्रध्दास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करून अवमान केला आहे. अशा व्यक्तीला राज्यातील सर्वोच्च घटनात्मक पदावर बसण्याचा कोणताही नैतिक अधिकार उरलेला नाही. यामुळे अशा व्यक्तीला तात्काळ पदावरून पायउतार करावे या मागणीसाठी आज इस्लामपूर बंदचे आवाहन करण्यात आले होते.
कार्यकर्त्यांनी.क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यास अभिवादन करून एकत्रितपणे घोषणा देत रॅलीने इस्लामपूर मधील सर्व प्रमुख चौकातून इस्लामपूर तहसीलदार कचेरी समोर हुतात्मा चौकात शिवराय आणि डॉ बाबासाहेब यांना अभिवादन करून सभा झाली. यावेळी संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, अखिल भारतीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना उध्दव ठाकरे गट, बळीराजा शेतकरी संघटना, अखिल भारतीय सत्यशोधक समाज, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, अंधश्रध्दा निर्मूलन समिती, छत्रपती शिवाजी महाराज व बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती, महात्मा फुले विचार मंच, भारतीय क्रांती दल व्यापारी महासंघ, बिझनेस फोरम, इस्लामपूर बार असोसिएशन, मुस्लिम लीगचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
हेही वाचा >>> सोलापूर: शिवसेनेत पद घेण्यास दिलीप सोपल यांचा नकार
यावेळी झालेल्या सभेत प्राचार्य विडास सायनाकर म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. आपल्या सर्व जाती-धर्माच्या लोकांची अस्मिता असून अशा सवोङ्ख श्रध्दास्थानाचा राज्यपाल सातत्यो अवमान करत आहेत..या पदाची प्रतिष्ठा यामुळे गेली असून त्यांना तात्काळ पायउतार करावे अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र होईल. यावेळी राज्यपाल कोश्यारी चले जाव अशा घोषणाही दिल्या. यावेळी प्रमुख उपस्थितपैकी खंडेराव जाधव, शहाजी पाटील, अशोक शिंदे, शकील सय्यद, बी. जी. काका पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, आपासाहेब पाटील आदींची भाषणे झाली. या सभेत राज्यपाल हटाव, वाचाळवीरांवर कारवाईची मागणी करणारे ठराव यावेळी करण्यात आले. या मागण्याचे निवेदन तहसिलदारांना देण्यात आले.