सांगली : कर्नाटकातील बससेवा महाराष्ट्रातून बंद असली तरी सीमावर्ती मिरज आगारातून कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसमधून प्रवासीसेवा रविवारी सुरूच होती. कर्नाटक परिवहन विभागाने मिरज आगारात बससेवा सुरूळीत ठेवण्यासाठी एक खास निरीक्षकही नियुक्त केला असून आलेली बस प्रवासी भरून मार्गस्थ करण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे.
महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या चालक-वाहकाला कन्नड समर्थक कार्यकर्त्यांकडून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मारहाण आणि तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. याचे पडसाद सीमावर्ती भागात उमटले. जिल्ह्यातील सांगली, जत, मिरज आगारातून कर्नाटकात होणारी बससेवा महाराष्ट्र परिवहन विभागाने स्थगित केली आहे. तथापि, रायबाग तालुक्यातील चिंंचणी येथे मायाक्का देवीच्या पाकाळणीसाठी जाणार्या भाविकासाठी काही बस सोडण्यात आल्या. मात्र, अन्य ठिकाणी जाणार्या बस स्थगित करण्यात आल्या आहेत. तथापि, महाराष्ट्रातून जाणार्या बस बंद असल्या तरी कर्नाटक परिवहन विभागाच्या बस मिरज आगारापर्यंत येत असून त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचे रविवारी दिसले. प्रवाशांची गैरसोय होउ नये यासाठी या बस सुरू ठेवण्यात आल्याचे कर्नाटकाती चालक-वाहकांनी सांगितले. विजयपूर, चिकोडी, अथणीसाठी ही बस सेवा उपलब्ध होती.