वाई : साताऱ्यात सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली. महाबळेश्वर, पाचगणी, सातारा शहरासह जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. ढगांच्या गडगडाटासह जोरदार वाऱ्याने नागरिकांची चांगलीच धावपळ उडाली.
सातारा शहरासह जिल्ह्यात आज सायंकाळी विजांच्या प्रचंड कडकडाटासह जोरदार अवकाळी पावसाला सुरुवात झाली. पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वर-पाचगणी येथील भिलार,कास पठार ,वाई, उत्तर कोरेगाव मधील पिपोडे,वाठार,शिवथर,सतारारोड या भागात जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यानं उकाडय़ात प्रचंड वाढ झाली होती. सोसाटय़ाच्या वाऱ्याने अनेकांची तारांबळ उडाली. वारा सुटल्याने सुमारे एक तासाहून अधिक काळ वीज गायब झाली होती. महाबळेश्वर मार्केटमध्ये अचानक पाऊस आल्यानं पर्यटकांची धावपळ उडाली. पावसात भिजत पर्यटकांनी पर्यटनाचा आनंद घेतला.मात्र विजांच्या व ढगांच्या गडगडाटाने अनेकांना धडकी भरली.उन्हाच्या कडाक्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला.
पाऊस सुमारे पाऊण तास जोरदार कोसळत होता, त्यामुळे सातारा शहरातील प्रमुख रस्त्यांवर वाहतूक कोंडी झाली होती. तसेच पावसाच्या पाण्याचे मोठे लोट तयार होऊन राजवाडा, राधिका रोड, नगरपालिका चौक येथे पाण्याची तळी आणि डबकी साचली होती. मेघगर्जनेसह सुरू असलेल्या पावसात परिसरातील वीज गुल झाल्यामुळे आणखीनच भर पडली. सायंकाळी उशिरा वीज वितरण कंपनीकडून काही भागांमध्ये वीज चालू करण्यात आली. मात्र सोसाटय़ाच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडे तसेच मोठय़ा फांद्या पडल्यामुळे अनेक परिसरात वीज रात्री उशिरापर्यंत गेलेलीच होती. दरम्यान अवकाळी पावसामुळे शेतकरी वर्ग चिंतेत पडला असून काढणीला आलेला कांदा, न्हाळी ज्वारी, उन्हाळी भुईमूग, तसेच आंबा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला. जोराच्या वाऱ्यामुळे शेकडो झाडाला लगडलेल्या कैऱ्यांचा खच शेतात पडून नुकसान झाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा