राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवशेनाचा आजचा पाचवा दिवस आहे. काल (१२ डिसेंबर) मराठा आरक्षण, जुनी पेन्शन योजना, अंमली पदार्थांची तस्करी आदी मुद्द्यांवर विधानसभा आणि विधान परिषदेत वादळी चर्चा झाली. तर, आजही दोन्ही सभागृहात विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू आहे. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सभागृहात गैरहजर आहेत. तिघेही मध्य प्रदेशात होत असलेल्या शपथविधी कार्यक्रमाला गेल्याने विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी याबाबत एक्सवर पोस्ट करून टीका केली.
“मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री मध्यप्रदेशात जाऊन आज काय दिवे लावणार आहे?”, असा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी अजित पवारांच्या शैलीत विचारला. “पीएचडी करून पोरं काय दिवे लावणार, असा प्रश्न अजित पवारांनी काल सभागृहात विचारला होता. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद आजही उमटत आहेत. त्यांची हीच शैली वापरून विजय वडेट्टीवारांनी राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
“महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुणांच्या जीवनात अंधार असताना, त्यांच्या समस्यांवर अधिवेशनात चर्चा करणे सोडून तीनही इंजिन आज शपथविधी सोहळ्यासाठी मध्यप्रदेशला पोहचलेत”, असं विजय वडेट्टीवार म्हणाले.
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उमुख्यमंत्री अजित पवार आज मध्य प्रदेशात होत असलेल्या शपथविधी सोहळ्यासाठी गेले आहेत. मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ मोहन यादव यांनी घेतली. या शपथविधी कार्यक्रमाला भाजपाबहुल राज्यातील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. तर, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाही या कार्यक्रमाला हजर होते.
मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांच्या सीमा एकमेकांना लागून असल्याने एकमेकांच्या साथीने दोन्ही राज्यांचा विकास करण्यासाठी परस्परांना सहकार्य करण्याबाबत मध्य प्रदेशच्या नवनिर्वाचित मुख्यमंत्र्यांनी सहमती दर्शवली, असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.