साधू-महंतांना विश्वासात घेतल्याचे सांगत शासन व प्रशासनाने सिंहस्थासाठी जुन्या पारंपरिक मार्गाऐवजी निश्चित केलेल्या नवीन पर्यायी शाही मार्गाला तीन आखाडय़ांच्या महंतांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांसमक्ष विरोध दर्शवत, कोणालाही न विचारता परस्पर त्याबाबत निर्णय घेतला गेल्याचे म्हटले आहे. काही साधू-महंतांच्या या भूमिकेमुळे पर्यायी मार्गावर पुन्हा अनिश्चिततेचे मळभ दाटले गेले. या मुद्दय़ावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाखो भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून हा पर्याय निवडण्यात आला असून, साधू-महंतांनी त्यास सहकार्य करावे असे आवाहन केले.
नाशिक व त्र्यंबकेश्वर येथील आगामी सिंहस्थ कामांचा शनिवारी मुख्यमंत्र्यांनी सखोल आढावा घेतला. यावेळी दिगंबर आखाडय़ाचे महंत रामकिशोर दास यांनी प्रशासनाने निश्चित केलेल्या पर्यायी शाही मार्गास विरोध दर्शविला. गत सिंहस्थात पारंपरिक शाही मार्गावर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडून २९ भाविकांना प्राण गमवावे लागले होते. यामुळे अतिशय अरुंद आणि उताराच्या या मार्गावर प्रशासनाने काही साधू-महंताशी चर्चा करून पर्यायी मार्ग निश्चित करून तोडगा काढला आहे. तथापि या प्रक्रियेत सिंहस्थाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या स्थानिक आखाडय़ांना विश्वासात घेण्यात आले नसल्याची तक्रार रामकिशोर दास यांनी केली. दिगंबर, निर्मोही व निर्वाणी या तीन आखाडय़ांचे ७०० खालसे आहेत. जुना पारंपरिक शाही मार्ग आम्ही बदलणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली. यावर मुख्यमंत्र्यांनी भाविकांच्या गर्दीचे व्यवस्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले. कुंभमेळा यशस्वी झाल्यास नाशिकच्या नावलौकिकात भर पडणार आहे. त्यामुळे सर्वानी एकत्रितपणे काम करणे आवश्यक आहे. साधुग्रामसाठी कायमस्वरूपी जागा अधिग्रहित करणे तसेच कुंभमेळा प्राधिकरण स्थापण्याच्या साधू-महंतांच्या सूचनांचा निश्चितपणे विचार करण्यात येईल. सिंहस्थ कामांसाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. कुंभमेळ्याच्या तयारीसाठी कमी कालावधी शिल्लक असल्याने विभाग आणि जिल्हा पातळीवर अधिकारांचे विकेंद्रीकरण केले जाईल. कुंभमेळ्याची माहिती देशभर पोहोचविण्यासाठी ‘ब्रँडिंग’ही केले जाईल. सिंहस्थात भाविकांची संख्या मोठी असल्याने स्वच्छतेबाबत नागरिकांनी दक्षता बाळगणे महत्त्वाचे आहे. स्वच्छतेच्या कामात राज्यातील सेवाभावी संस्थांना सहभागी करावे, असे फडणवीस यांनी सूचित केले.
पर्यायी शाही मार्गही अनिश्चिततेच्या भोवऱ्यात
साधू-महंतांना विश्वासात घेतल्याचे सांगत शासन व प्रशासनाने सिंहस्थासाठी जुन्या पारंपरिक मार्गाऐवजी निश्चित केलेल्या नवीन पर्यायी शाही मार्गाला तीन आखाडय़ांच्या महंतांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांसमक्ष विरोध दर्शवत, कोणालाही न विचारता परस्पर त्याबाबत निर्णय घेतला गेल्याचे म्हटले आहे.
First published on: 22-02-2015 at 02:19 IST
मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm at nashik kumbh mela