शिर्डी : सत्तेमुळे सुखासीन झाल्यास जनतेशी द्रोह केल्यासारखे होईल. हा महाविजय जनतेला सुखी करण्यासाठी आहे, असे परखड मतप्रदर्शन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी भाजप प्रदेश अधिवेशनात येथे केले. भाजपला निवडणुकीत पराभूत करता येत नाही, यामुळे निराश झालेल्या विरोधकांचा राज्यात अराजक माजविण्याचा व समाजात दुफळी निर्माण करण्याचा कट असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाराष्ट्रात भाजपला सलग तिसऱ्यांदा १०० हून अधिक जागा मिळाल्या, तर सत्ताधारी पक्षाला सर्वाधिक २२२ जागा मिळाल्याचा विक्रम मोडीत काढण्यात आला आणि महायुतीला २३७ जागा मिळाल्या. पण हा प्रचंड विजय आपल्याला सत्ता भोगण्यासाठी नसून जनतेला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी आहे, असे फडणवीस यांनी नमूद केले.

भाजपला निवडणुकीत पराभूत करता येत नाही, हे लक्षात आल्यावर राज्यात खोटे कथानक पसरविणे, अपप्रचार करणे, अराजक माजविणे, असे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (उद्धव ठाकरे) व काँग्रेसने केले. राज्यात मतजिहाद झाला. मालेगाव व अन्य ठिकाणी अचानक शेकडो लोकांनी जन्मदाखले घेतले. बांगलादेशी घुसखोर कागदपत्रे तयार करून मतदारयादीत नावे नोंदवीत आहेत. राज्यात अराजकता माजविणाऱ्या ताकदीविरोधात लढण्याचे आव्हान असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा >>> नितीन गडकरी म्हणाले, “नागपुरात एक लाख कोटींची कामे केली, पण…”

पदाधिकारी, कार्यकर्त्यांना खडे बोल

राष्ट्र प्रथम व मी स्वत: सर्वात शेवटी अशी पक्षाची शिकवण आहे. त्यामुळे नेते, पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी विनाकारण किंवा ऊठसूट कोणत्याही प्रकारे मिरविण्यासाठी (स्टेटस सिंबॉल) म्हणून मंत्रालयात येऊ नये. जनतेची कामे घेऊन जरूर यावे. त्याचबरोबर ग्रामविकास विभागाची २५/१५ ही योजना कोणालाही ‘रोजगार’ देण्यासाठी नसून जनतेचे दुख: दूर करण्यासाठी आहे, याची जाणीव ठेवण्याची समजही फडणवीस यांनी दिली.

हेही वाचा >>> मुंबईतील वित्तीय, गुंतवणूक संस्थांची माहिती गोळा करा; मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांचे आदेश

काँग्रेससारखे वागू नका गडकरी

जनतेने प्रचंड बहुमताने आपल्याला सत्ता दिली असून त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करण्याची जबाबदारी पार पाडली पाहिजे. जनतेची परिस्थिती सुधारली नाही किंवा कामे झाली नाहीत, असे काँग्रेसप्रमाणे वागू नका, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. राज्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दीड कोटी सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पूर्ण करावे, अशा सूचना केंद्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी दिल्या.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cm devendra fadnavis address party workers at bjp state convention zws