Sardesai Wada Memorial: ‘छावा’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर तरुणांना छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासात रस निर्माण झाल्याचे दिसत आहे. छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाच्या सैनिकांनी संगमेश्वर येथे असलेल्या सरदेसाई वाड्यात कैद केले होते. हा प्रसंग छावामध्ये पाहिल्यानंतर अनेक पर्यटक आता संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा पाहण्यासाठी जात आहेत. मात्र या वाड्याची पडझड झाल्याचे पाहून अनेकांना दुःख होते. आज विधानपरिषधेत शिवसृष्टीची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) आमदार अमोल मिटकरी यांनी सरदेसाई वाड्यासंदर्भात प्रश्न विचारला. यावर उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरदेसाई वाड्यात भव्य स्मारक उभारणार असल्याची घोषणा केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

सरदेसाई वाड्यातील स्मारकाबाबत माहिती देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सरदेसाई वाड्यात छत्रपती संभाजी महाराज थांबले होते. हा वाडा अधिग्रहीत करून तेथे छत्रपती संभाजी महाराजांना साजेसे स्मारक उभारण्याकरिता राज्य सरकार पुढाकार घेईल. छत्रपती संभाजी महाराज हे शौर्याचे प्रतिक आहे. ते धर्मवीर, स्वराज्यरक्षक आहेत. सरदेसाई वाड्यात उचित प्रकारचे स्मारक उभारण्यात येईल.

धोक्याने झाली होती कैद

संगमेश्वर येथील सरदेसाई वाड्यात निवडक सहकाऱ्यांसह छत्रपती संभाजी महाराज थांबले असताना औरंगजेबाने धोक्याने त्यांना कैद केले होते. याच वाड्यातून त्यांना नेण्यात आले. छावा चित्रपटात हा सीन दाखविण्यात आल्यानंतर अनेक शिवप्रेमींना संगमेश्वरमधील सरदेसाई वाडा खुणावू लागला. मात्र याठिकाणी दुरवस्था झाल्यामुळे शिवप्रेमी अस्वस्थ होत होते, त्याची दखल आता सरकारने घेतली असून स्मारक उभारण्याची घोषणा करण्यात आली आहे.

संगमेश्वर येथील सरदेसाई वाडा छोटा आहे. तिथे फार जागा नाही. त्यामुळे सरदेसाई वाड्याच्या आजूबाजाला असलेली १०० एकर जागा अधिग्रहीत करून तिथे भव्य असे स्मारक उभारले जावे, अशी मागणी भाजपाचे आमदार प्रसाद लाड या चर्चेदरम्यान केली. यावर उत्तर देताना शंभूराज देसाई म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्मारक उभारण्याची घोषणा केलेली आहेच. त्यामुळे सरकारची समिती वाड्याची पाहणी करेल. गावकरी स्वतःहून जागा देण्यास तयार असतील तर ती विकत घेण्यासाठी सरकार पुढाकार घेईल. जर जागा मिळण्यात अडचण आली तर जिल्हाधिकाऱ्यांना जमीन अधिग्रहीत करण्यासंदर्भात निर्देश देण्यात येतील.

महाराष्ट्रात ठिकठिकाणी शिवसृष्टी उभारण्या संदर्भात विधानपरिषदेत चर्चा सुरू असताना आमदार अमोल मिटकरी यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. याशिवाय महाराष्ट्रात ठिकठिकाणी डिजिटल शिवसृष्टी, रायगड येथील पाचाड येथे असलेले राजमाता जिजाऊंचे समाधीस्थळ आणि बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथील जन्मस्थळ यांचाही विकास केला जाणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले.

Story img Loader