IIT अर्थात इंडियन इन्स्टिट्युट ऑफ टेक्नॉलॉजीच्या देशभरातील संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर दरवर्षी विद्यार्थी प्रवेश घेत असतात. पण आता आयआयटीबरोबरच IICT देखील देशभरात शिक्षण क्षेत्रात नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सज्ज झाली आहे. विशेष म्हणजे पहिली आयआयसीटी संस्था मुंबईत उभारली जाणार असून त्यासाठी गोरेगावमधील फिल्म इंडस्ट्रीत जागा उपलब्ध करून दिली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.

मुंबईत १ ते ४ मे २०२५ दरम्यान मुंबईतल्या जिओ कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ‘वर्ल्ड ऑडिओ-व्हिज्युअल अँड एंटरटेन्मेंट समिट २०२५ अर्थात वेव्हज २०२५’ या परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातल्या प्राथमिक सत्राचं आयोजन दिल्लीतील सुषमा स्वराज भवन येथे करण्यात आलं होतं. यावेळी देवेंद्र फडणवीस बोलत होते.

IICT ची उभारणी, कलात्मकतेला नवी दिशा!

मुंबईत उभारल्या जाणाऱ्या आयआयसीटीसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सविस्तर भाष्य केलं. यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी या नव्या संस्थेची माहिती दिली. “या संस्थेच्या माध्यमातून मुंबईला जागतिक स्तरावरील ‘क्रिएटिव्ह हब’ बनवण्याचा सरकारचा मानस असून केंद्र सरकारकडून या संस्थेच्या उभारणीसाठी ४०० कोटींची आर्थिक सहाय्यता दिली जाणार आहे. फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर संपूर्ण देशाच्या क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी क्षेत्रासाठी हा उपक्रम मैलाचा दगड ठरेल”, असं फडणवीसांनी नमूद केलं.

याशिवाय, आयआयसीटीमधील समाविष्ट बाबींची फडणवीसांनी माहिती दिली. “इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी, ही संस्था केवळ चित्रपट निर्मितीपर्यंत मर्यादित न राहता इथे डिजिटल कंटेंट, व्ही. एफ. एक्स (VFX), अॅनिमेशन, ऑडिओ-व्हिज्युअल स्टोरीटेलिंग, मीडिया इनोव्हेशन आणि वेब ३.० तंत्रज्ञान अशा क्षेत्रांमध्ये संशोधन व प्रशिक्षण देण्यात येईल. आयआयटी मुंबईप्रमाणेच ही नवी संस्था क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीसाठी देशातलं सर्वोत्तम केंद्र बनेल”, असं मुख्यमंत्री म्हणाले.

बॉलिवुडपाठोपाठ IICT मुंबईची ओळख बनणार!

दरम्यान, बॉलिवुडपाठोपाठ आयआयसीटीमुळे क्रिएटिव्ह इंडस्ट्रीला मुंबईत जागतिक दर्जाचं व्यासपीठ मिळणार असल्याचं फडणवीसांनी यावेळी नमूद केलं. “दावोस ज्याप्रमाणे आर्थिक क्षेत्रासाठी महत्त्वाचं आहे, त्याचप्रमाणे हे व्यासपीठदेखील क्रिएटिव्ह तंत्रज्ञान क्षेत्रासाठी जागतिक ब्रँड तयार करणारं ठरेल”, असा विश्वास देवेंद्र फडणीसांनी व्यक्त केला.

काय आहे ‘वेव्हज २०२५’?

वेव्हज २०२५ ही परिषद ब्रॉडकास्टिंग, चित्रपट, ॲनिमेशन, गेमिंग, डिजिटल मीडिया, संगीत, जाहिरात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्स आणि नवीन तंत्रज्ञान या क्षेत्रांमध्ये कार्यरत असलेल्या व्यावसायिकांसाठी मोठे व्यासपीठ ठरेल. या क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीच्या संधी निर्माण करण्यासाठी तसेच नवकल्पनांना चालना देण्यासाठी ‘वेव्हज बाजार’, ‘वेव्हएक्सेलेरेटर’ आणि ‘क्रेटोस्फीअर’ या विशेष उपक्रमांची सुरुवात केली जाणार आहे.

यामुळे माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणूक वाढण्यास मदत होईल, नवनवीन कल्पनांना चालना मिळेल आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती वाढवण्याची संधी मिळेल.