CM Devendra Fadnavis Comment on Opposition Leader Post: महाराष्ट्राची राजकीय संस्कृती वेगळी आहे. इथे दक्षिणेतील राजकारण्याप्रमाणे ‘खून के प्यासे’ असे राजकारण केले जात नाही. आमच्याकडे भक्कम बहुमत असले तरी आम्ही विरोधकांच्या आवाजाला दाबणार नाही, त्यांचा आवाज तेवढाच महत्त्वाचा आहे, असे विधान महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषेदत व्यक्त केले. विरोधकांचे संख्याबळ कमी आहे. जर विरोधकांच्या आवाजाला महत्त्व देणार असाल तर विरोधी पक्षनेते पदासाठी पाठिंबा देणार का? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नावर फडणवीस यांनी महायुतीची भूमिका व्यक्त केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय विधानसभा अध्यक्ष घेत असतात. सरकार याबाबत निर्णय घेत नाही. अध्यक्ष जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. लोकसभेत जेव्हा १० वर्ष विरोधी पक्षनेतेपद नव्हते, तरीदेखील जो सर्वात मोठ्या पक्षाचा नेता होता, त्याला विरोधी पक्षनेत्याप्रमाणे सर्व अधिकार लोकसभेने दिले होते. तसेच जिथे जिथे विरोधी पक्षनेता असतो, तिथे तिथे त्यांना घेतले गेले होते. अध्यक्षांनी जर विरोधी पक्षनेता देण्यास मान्यता दिली तर आम्हाला हरकत नसेल.”

हे वाचा >> “आधी मी CM म्हणजेच ‘कॉमन मॅन’ होतो, आता DCM…”, शपथविधीनंतर एकनाथ शिंदेंचं मोठं विधान

विरोधकांच्या विषयालाही सन्मान दिला जाईल

मागच्या पाच वर्षांत राज्याने खूप काही राजकारण पाहिले, पुढची पाच वर्ष वेगळे राजकारण पाहायला मिळणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, “यावेळी पूर्णपणे वेगळे राजकारण असेल. मी आधीच सांगितले की, मला बदल्याचे नाही तर बदल दाखवेल, असे राजकारण करायचे आहे. विरोधकांची संख्या कमी आहे, हे खरे आहे. पण विरोधकांच्या आवाजावर किंवा त्यांच्या संख्येवर आम्ही मूल्यमापन करणार नाही. त्यांनी योग्य विषय मांडले. तर त्या विषयाला तेवढ्याच प्रकारचा सन्मान देऊ. स्थिर सरकारचे पाच वर्ष पाहायला मिळतील. जनतेने प्रचंड असे बहुमत दिले आहे. त्यामुळे जनतेला स्थिर सरकार देणे ही आमची जबाबदारी आहे.”

“२०१९ ते २०२२ च्या मध्यापर्यंत राज्याला जे वेगवेगळे बदल दिसले, तसे धक्के यापुढे लागू नयेत, ही जनतेची अपेक्षा आम्ही पूर्ण करू”, असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हे ही वाचा >> Devendra Fadnavis on Next 5 Year Plan: मंत्रिमंडळ विस्तार, विधानसभा अध्यक्षांच्या निवडीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची महत्त्वाची घोषणा

‘खून के प्यासे’ असे महाराष्ट्राचे राजकारण नाही

महाराष्ट्राची राजकीय संस्कृती इतर राज्यांपेक्षा वेगळी आहे. राजकारणातून संपवू, असे म्हणणाऱ्या नेत्यांबद्दल त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्राचे पूर्वी जे राजकीय वातावरण होते, ते पुन्हा योग्य कसे करता येईल, याचा प्रयत्न सर्वच राजकीय पक्षांना करावा लागेल. आज शपथविधीचे आमंत्रण सर्वच माजी मुख्यमंत्र्यांना दिले होते. तसेच राज ठाकरे यांनाही शपथविधीचे आमंत्रण मी स्वतः फोन करून दिले होते. मात्र त्यांच्या वैयक्तिक कार्यक्रमामुळे ते येऊ शकले नाहीत. महाराष्ट्रातला राजकीय संवाद कधीही संपलेला नाही. दक्षिणेत ज्याप्रमाणे खून के प्यासे, असे राजकारण असते. त्याप्रकारचे राजकारण महाराष्ट्रात होत नाही.