बुलढाणा- वाशिम दौऱ्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे वाशिम दौरा रद्द करत मुंबई गाठले. सिंदखेड राजा येथे कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर फडणवीस यांना अशक्तपणा जाणवू लागला. अखेर त्यांनी दौरा रद्द केला आणि औरंगाबाद विमानतळ गाठले. औरंगाबादवरुन ते मुंबईत परतले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विविध विकास कामांचे लोकार्पण व भूमिपूजन करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुरुवारी बुलढाणा व वाशीम जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.  बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे  सकाळी ११ वाजता मुख्यमंत्र्यांचे आगमन झाले. विकास कामांचे उद्घाटन केल्यानंतर फडणवीस हे वाशिमला जाणार होते. मात्र, या दरम्यान त्यांना अशक्तपणाचा त्रास जाणवू लागला.

प्रकृती अस्वास्थ्यामुळे फडणवीस यांनी वाशिम दौरा रद्द केला. तिथून ते औरंगाबाद विमानतळावर गेले आणि तिथून विमानाने मुंबईत परतले आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

वाशिममध्ये धनगर समाजाचे कार्यकर्ते संतापले

३०० कोटी रुपयांच्या कामाचे लोकार्पण आणि नवीन ६०० कोटींच्या कामाचे भूमिपूजन या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री बुलढाण्यावरुन वाशिममध्ये जाणार होते. मात्र बुलढाणा येथील कार्यक्रम संपल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडली. वाशिम येथील कार्यक्रमात मुख्यमंत्री येणार नाहीत, याची माहिती मिळताच धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांनी पिवळ्या रंगाचे रुमाल भिरकावून गोंधळ केला. शेवटी पोलिसांनी गोंधळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढले. वाशिममध्ये मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत पालकमंत्री संजय राठोड, राज्यमंत्री रणजित पाटील, आमदार राजेंद्र पाटणी, लखन मलिक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.