Devendra Fadnavis Speech in Vidhan Sabha: सोमवारी नागपूरमध्ये घडलेल्या दंगलीची सध्या राज्यभर चर्चा चालू आहे. खुद्द मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या गोष्टी घडत त्यासंदर्भात देवेंद्र फडणवीसही विरोधकांच्या निशाण्यावर आल्यानंतर याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. विधानसभेत यासंदर्भात मंगळवारी दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर निवेदन दिलं. आता नागपूरमधील परिस्थिती पूर्वपदावर येऊ लागली असून पोलिसांकडून दोषींना शोधून काढण्याचं काम चालू आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा विधानसभेत निवेदन दिलं आहे.

दोन भिन्न भूमिका?

देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी विधानसभेत केलेल्या निवेदनात नागपूरमधील दंगलीच्या घटनांमध्ये ‘पूर्वनियोजित पॅटर्न’ दिसत असल्याचं म्हणत हा कारस्थानाचा भाग असल्याचे सूतोवाच दिले होते. मात्र, यासंदर्भात नागपूरचे पोलीस आयुक्त वेगळी माहिती देत असून मुख्यमंत्री वेगळी भूमिका मांडत असल्याचा मुद्दा नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला. त्यावर फडणवीसांनी भूमिका स्पष्ट केली.

“नागपूरच्या सीपींनी सांगितलं की हे पूर्वनियोजित होतं की नाही याची आम्ही चौकशी करत आहोत. अजून अंतिम निष्कर्षापर्यंत आलेलो नाही. त्यामुळे ते वेगळं बोलले आणि मी वेगळं बोललो असं काहीही नाही”, असं देवेंद्र फडणवीसांनी नमूद केलं.

“बाकी सगळं क्षम्य आहे, पण…”

दरम्यान, पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांना अद्दल घडवणारच, या भूमिकेचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केला. “मी पुन्हा सांगतो, नागपूर प्रकरणात ज्यांनी पोलिसांवर हल्ले केले असतील, त्यांना कबरीतूनही खोदून काढू. सोडणार नाही. बाकी सगळ्या गोष्टी क्षम्य आहेत. पण पोलिसांवर हल्ला क्षम्य नाही. त्यामुळे त्यांच्यावर कठोरातली कठोर कारवाई नियोजित वेळेत केली जाईल”, असं फडणवीस म्हणाले.

“कुठेही आयात लिहिलेली नव्हती”

“आता नागपूर शांत आहे. नागपूर शांततेसाठीच प्रसिद्ध आहे. १९९२ नंतर नागपुरात कधीही दंगल झालेली नाही. परवाची झालेली घटना काही लोकांनी जाणीवपूर्वक घडवून आणला हे लक्षात येतं. तिथे औरंगजेबाची कबर जाळली गेली. त्यावर कुठलीही आयात लिहिलेली नव्हती. आम्ही या गोष्टीचा सखोल तपास केला आहे. पण जाणीवपूर्वक आयाती जाळल्या अशा प्रकारचे संदेश पसरवण्यात आले आणि त्यातून ही पुढची घटना घडली”, अशी माहिती देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात दिली.

“जे लोक असं सामाजिक स्वास्थ्य बिघडवतात, जाणीवपूर्वक अशा अफवा पसरवतात त्यांनाही दोषी धरण्यात येईल. काही लोकांना पकडलंही आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत अत्यंत कठोर कारवाई केल्याशिवाय आम्ही थांबणार नाही”, असं ते म्हणाले.

“कायदा व सुव्यवस्थेच्या बाबतीत अनेक आव्हानं आपल्यासमोर आहेत. पण राज्य सरकार त्या आव्हानांना सामोरं जाऊन त्यातून राज्यातल्या जनतेला चांगल्यातली चांगली कायद व सुव्यवस्थेची परिस्थिती कशी देता येईल यासाठी प्रयत्न करत आहे”, असंही फडणवीसांनी नमूद केलं.

Story img Loader